मुंबई - बालमृत्यूमागे कुपोषण एक कारण असू शकते. कुपोषण ही मोठी समस्या केवळ राज्यात नाही तर देशभरात आहे. कुपोषणामुळे मृत्यू नाही हे नाकारू शकत नाही. जिल्हास्तरावर आदिवासी विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला आणि बाल विकास विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची समन्वय समिती बनवू अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत केली.
कुपोषणाच्या मुद्द्यावर मंगलप्रभात लोढा म्हणाले की, कुपोषण ही गंभीर समस्या आहे. याबाबत जिल्हास्तरावर समन्वयाचा अभाव असल्याची तक्रार अनेक सदस्यांनी सभागृहात केली. त्यावर लवकरच जिल्हास्तरीय शासनाच्या विभागांशी, लोकप्रतिनिधींशी समन्वय समिती बनवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर ठेवला जाईल. जेणेकरून विभागांच्या योजनांचा कुपोषित बालकांपर्यंत लाभ पोहचेल यासाठी ही समिती काम करेल असं त्यांनी म्हटलं.
तसेच पुढील १ महिन्याच्या आत महिला व बालविकास विभागाची मोठी बैठक आदिवासी विकास विभागासोबत घेऊन समस्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करू असंही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत म्हटलं. कुपोषणाच्या मुद्द्यावर सभागृहात विरोधकांनी सरकारला आक्रमकपणे धारेवर धरले. आदिवासी विभागाच्या मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने विरोधकांनी या प्रश्नावर सभात्यागही केला होता.
प्रश्न राखून ठेवण्याची मागणी राज्यात कुपोषित बालकांचा मृत्यू होत असताना आदिवासी विकास मंत्री योग्य उत्तर देत नाही. ते आरोग्यमंत्र्यांकडे बोट दाखवत आहेत. परंतु आरोग्य मंत्र्यांकडेही त्याचे उत्तर नाही. सभागृहात योग्य उत्तर मिळत नाही तोवर आमचे समाधान होणार नाही. त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवावा अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केली. परंतु त्यानंतर प्रश्न रेटून नेण्याचा प्रयत्न केला असता विरोधकांनी गोंधळ घालत सभात्याग केला.