रत्नागिरी : वाढत्या उष्णतेमुळे आंबा तयार होऊ लागला असून, काढणी प्रक्रिया सर्वत्र सुरू आहे. जिल्ह्यातील बागायतदारांची वाशी बाजारावरच अधिक भिस्त असल्याने तेथील आवक वाढली आहे. कोकणातून दररोज ७० ते ७५ हजार पेट्या वाशी बाजारात जात आहेत. त्याचवेळी कर्नाटक राज्यातून २५ हजार आंबा पेटी विक्रीसाठी येत असल्यामुळे लाखभर पेट्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ही आवक वाढल्याने आता दर कमी आला असून, एका पेटीला बाराशे ते तीन हजार रुपये आकारले जात आहेत.
हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. अवकाळी पावसातून बचावलेल्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मोहराचा आंबा मार्चपासून बाजारात आला. मात्र, तिसऱ्या टप्प्यात अति थंडीमुळे परागीकरणाअभावी फळधारणा झालीच नाही. आता चाैथ्या टप्प्यातील मोहराचा आंबा तयार होत असून, तो बाजारात येऊ लागला आहे. मात्र, हा आंबा बाजारात येण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. किरकोळ मार्केटमध्येही दर कमी होऊ लागले असून १५ मे पर्यंत आवक भरपूर होणार असून ग्राहकांना परवडणाऱ्या दरात आंबा उपलब्ध होईल, असा अंदाज आंबा व्यापारी व्यक्त करीत आहेत.
परदेशात मागणीपरदेशातून आंब्यासाठी वाढती मागणी आहे. वाशी बाजारात आलेला आंबा आखाती प्रदेशासह अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये जात आहे. प्रत्येक देशाच्या नियमावलीनुसार उष्ण, शीत, बाष्पजल, तसेच विकिरण प्रक्रिया करूनच आंबा हवाईमार्गे निर्यात होत आहे.
परराज्यातील आंबाकोकणातील हापूससह कर्नाटकमधील हापूस व लालबाग, गुजरातमधून केसर, तोतापुरी, आंध्र प्रदेशमधून बदामी किंवा बैगनपल्ली हेही वाशी बाजारात दाखल झाले आहेत. कोकणातील हापूस १,२०० ते ३,००० रुपये पेटी या दराने विकला जात आहे. केसर १०० ते १५० रुपये, बदामी ७० ते १०० रुपये, तोतापुरी ५० ते ६० रुपये, लालबाग ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकण्यात येत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीत बुधवारी कोकणातून ७६७६४ पेट्या व कर्नाटकमधून २४०४८ क्रेटची आवक झाली आहे. एकाच दिवशी १ लाख पेटी व क्रेटची विक्रमी आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये हापूस २०० ते ७०० रुपये किलो दराने विकला जात आहे. - संजय पानसरे, संचालक व आंबा व्यापारी, मुंबई बाजार समिती