ऑनलाइन लोकमत/ शंकर वाघ
शिरपूर जैन (वाशिम) दि. 25 - शेतकरी दिवसेंदिवस प्रगत होत आहे. नवनविन प्रयोग करुन शेती परवडण्यासारखी नाही म्हणणा-यांच्या समोर काही शेतकरी आदर्श ठरत आहेत. रिसोड तालुक्यातील किनखेडा ‘माणिक’ नामक युवा शेतक-याने शेतीत उसाची लागवड करुन बाजुलाच रसवंती व्यवसाय सुरु करुन शेतीला उद्योगाची जोड दिली आहे. यामधून त्याला दरमहा ६० ते ६५ हजार रुपयांचा व्यवसाय होत आहे. या शेतक-याची मेहनत व युक्ती पाहून अनेक शेतक-यांनी याच परिसरात शेतातील डाळींब, पपई विकणे सुरु केल्याचे दिसून आले.
पश्चिम महाराष्ट्रात जात असतांना रस्त्यांवर अनेक शेतकरी बसून हुरडा, हळद, आंबे यासह अनेक शेतीतून निघणारी फळे, भाजी विकतांना दिसून येतात. विदर्भात हे प्रमाण फारच कमी असले तरी वाशिम जिल्हयातील मराठवाड्याकडे जाणारा रस्ता वगळता चोहोबाजूने शेतक-यांनी शेतीतून होत असलेले उत्पन्न बाजारात न नेताच स्वत विक्री करीत असल्याने याचा त्यांना चांगला फायदा होत आहे. रिसोड तालुक्यातील युवा शेतकरी माणिक पंढरराव अवचार यांच्याकडे साडेचार एकर शेती आहे. या शेतीमधील केवळ अर्धा एकर शेतात उसाची लागवड ते सतत करतात. यामधून त्यांना दरवर्षी चांगले उत्पन्न होते. परंतु यावर्षी उसाला पाहिजे तसे भाव नसल्याने त्यांनी रसवंती सुरु करुन स्वताच्या शेतातील उस तेथे वापरणे सुरु केले. यामधून त्यांना फार मोठया प्रमाणात फायदा झाला. हिवाळा असतांना सुध्दा अनेक गाडया रसवंती मालेगाव - रिसोड महामार्गावर असल्याने थांबतात. अर्ध्या एकरात लावलेला हा उस त्यांना मे महिन्यापर्यंत पुरतो. यामधून त्यांना संपूर्ण ऊस काढणीपर्यंत ३ ते साडे तीन लाख रुपये उत्पन्न होत असल्याचे ते सांगतात. प्रत्येक शेतक-याने स्वताच्या शेतात पिकणारे पिकाचा असा प्रयोग केला तर नक्कीच शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नसल्याचे माणिक यांचे मत आहे.
उसाला भाव नसल्याने डोक्यात आले रसवंती सुरु करुन या उसाचे पैसे करावे. हिवाळा आहे लोकं मुर्खात काढतील आधी असे वाटले. उसाच्या शेताच्या बाजुलाच धु-यानजिक रसवंती टाकली जेणे करुन उसाची ने आण करण्यासाठी खर्च येवून नये. पहिल्यादिवशी ५५० रुपयांचा व्यवसाय झाला. दोन तीन दिवसानंतर यात वाढ होत गेली. आजच्या घडीला दोन ते अडीच हजार रुपये व्यवसाय रोज होत आहे.
- माणिक पंढरराव अवचार
शेतकरी, किनखेडा