ठाणे : ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ३१ अ मधील शिवसेनेच्या नगरसेविका संगीता पाटील यांच्यावर गुरुवारी केलेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी त्यांचे पूर्वाश्रमीचे पती-माजी नगरसेवक माणिक पाटील यांना श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्यांना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संगीता यांनी आपली मालमत्ता बळकावल्याचा आरोप माणिक यांनी केला आहे. त्याच वेळी त्यांच्यावर हल्ला केल्याचा मात्र त्यांनी इन्कार केला आहे. हल्ल्याची मला काहीही माहिती नसल्याचा दावा त्यांनी पोलिसांकडे केला आहे. माणिक यांच्याबरोबर घटस्फोट झालेला असतानाही ते पुन्हा आपल्याला त्रास देत आहेत. तसेच ही मालमत्ता लग्नापूर्वीच खरेदी केल्याचा दावा संगीता यांनी पोलिसांकडे केला. हल्लेखोरांनी संगीता यांच्यावर हल्ला करताना तलवारीच्या मुठीने प्रहार केला होता. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर मार लागला. सुदैवाने त्या गंभीर जखमी झाल्या नाही. दरम्यान, हल्लेखोर संतोष पाटील याच्यासह आणखी सात ते आठ जण पसार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली. तलवार कोणाच्या सांगण्यावरून आणली, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नगरसेविका हल्लाप्रकरणी माणिक पाटील अटकेत
By admin | Published: June 11, 2016 4:29 AM