मुंबई: विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून येवला मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव शिंदे यांनी निवडणुकीच्या काळात छगन भुजबळ यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यामुळे अखेर राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी त्यांची हकालपट्टी केली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव शिंदे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने शिंदे यांची मागणी फेटाळून भुजबळांनाच उमेदवारी दिली होती. त्यामुळे शिंदे नाराज झाले होते. त्यांनी भुजबळांच्या विरोधात भूमिका घेऊन प्रचार केला होता. तर शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांना पाठिंबा दिला होता. माणिकराव शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली होती.त्यामुळे अखेर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी काढलेल्या पत्रात म्हंटले आहे की, विधानसभा निवडणुकीत येवेला मतदारसंघातून छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. तर भुजबळ यांना निवडून आणण्याची पक्षाने आपल्यावर जवाबदारी दिली असताना आपण विरोधी भूमिका घेतली. तसेच शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला.
मतदारसंघात भुजबळांच्या विरोधात खोटे-नाटे आरोप करून त्यांना पराभूत करण्याचे आवाहन मतदारांना केले. तर शिस्तभंग केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष यांच्या शिफारशींची दखल घेत शिंदे यांच्याकडे लेखी खुलासा मागवण्यात आला होता. मात्र शिंदे यांनी केलेला खुलासा खोटा असल्याचे कारण देत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे या पत्रात म्हंटले आहे.