मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत अशावेळी राज्यातील सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यात साताऱ्यातील शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी सोमवारी भाजपात पक्षप्रवेश केला. सोनवलकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला असून या प्रवेशामुळे फलटण तालुक्यात भाजपाची ताकद वाढणार आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून माणिकराव सोनवलकर हे राजे गटासोबत सक्रीय होते. फलटण तालुक्यात सोनवलकर यांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. पक्षफुटीनंतर ते शरद पवारांसोबत कायम होते. ते जिल्हा परिषदेचे नेते असून आज ५ हजार कार्यकर्त्यांसह भाजपात सहभागी झाले अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
कोण आहेत माणिकराव सोनवलकर?
सुरुवातीला काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सोनवलकर हे राजकारणात सक्रीय आहेत. रामराजे गटाचे ते समर्थक मानले जातात. ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद अध्यक्ष असा त्यांना सातारा जिल्ह्यातील राजकारणात प्रवास राहिला. फलटण, कोरेगाव तालुक्यात माणिकराव सोनवलकर यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत.
अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामराजे गट भाजपाच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवर नाराज होता. त्यांनी निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत केल्याची चर्चा होती. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी राजे गटातील माणिकराव सोनवलकर यांना भाजपात आणून फलटणमध्ये रामराजेंना धक्का दिल्याचं बोललं जाते.
दरम्यान, महाराष्ट्रात काही दिवसांत विधानसभा निवडणुका लागणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यातील सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. दोन्ही युती, आघाड्यांमध्ये जागावाटपावरून बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यात अनेक नेते, अपक्ष यांच्या राजकीय उड्याही पाहायला मिळत आहे.
"समासमाजात भांडण लावण्याचं काम मविआ करतंय"
आगामी निवडणुकीला ध्यानात ठेवून महाविकास आघाडीत राज्यात समाजासमाजात भांडणं लावण्याचं काम करतेय हे राज्यातील जनतेला दिसतंय. जेव्हा जेव्हा काँग्रेस सरकार राज्यात असायचे विरोधी पक्षाने असं घाणेरडे राजकारण कधीच केले नाही. काँग्रेसविरोधातील सरकार जेव्हाही बनते, मग देश असो वा राज्य. या लोकांची मानसिकता समाजात फूट पाडणे, भांडणे लावणे हे आहे. सत्तेशिवाय काँग्रेस राहू शकत नाही. सरकारची प्रतिमा मलिन करणे. जनतेत भ्रम निर्माण करणे हे काम काँग्रेस करतंय असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.