मुंबई : शिवसेना-भाजपमधील वाद आता अधिकीच वाढताना दिसत आहे. तर शिवसेना 50-50 फॉर्म्युल्यावर अडून बसल्याचे पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, राज्याला पुन्हा निवडणुकीकडे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी केला. तसेच, आम्हाला नाही तर कुणालाच नाही अशी भाजपची भूमिका असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
राज्यात सध्या सत्ता संघर्षावरुन मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनामध्ये एकमत होत नाही, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातही सत्तास्थापनेबाबत खलबतं सुरु आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येताना पाहायला मिळत आहे.
तर याच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. आम्हाला नाही तर कुणालाच नाही अशी भाजपची भूमिका असल्याचे ते म्हणाले आहे. तर राज्याला पुन्हा निवडणुकीकडे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे.
भाजपची अंतिम भूमिका चार वाजेच्या बैठीकीनंतर स्पष्ट होणार आहे. तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शिवसेना आमदारांची बैठक घेतली असून, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार यावर ते ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही तासात राज्यातील राजकरणात मोठ्याप्रमाणावर घडामोडी घडताना पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.