ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 17 - राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची भाषणे एकाग्र चित्ताने ऐकणाऱ्या उपस्थित शेतकऱ्यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांचे भाषण सुरू होताच काढता पाय घेतला. काँग्रेसच्यावतीने दाभडी येथे आयोजित ह्यचाय की चर्चाह्ण कार्यक्रमात आयोजकांनी विनंती करूनही उपस्थित थांबण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील दाभडी येथे लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी ह्यचाय पे चर्चाह्ण या कार्यक्रमाद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना संबोधित केले होते. दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दाभडी येथे गुरुवारी ह्यचाय की चर्चाह्ण हे प्रतिकात्मक आंदोलन केले. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार दिग्वीजयसिंग, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमरींदरसिंग राजा ब्रार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, सिनेअभिनेते खासदार राज बब्बर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम उपस्थित होते.
या कार्यक्रमात खासदार दिग्वीजयसिंग, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, राज बब्बर आदींची भाषणे उपस्थितांनी एकाग्रतेने ऐकली. मात्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे भाषणाला उभे झाले. त्यावेळी उपस्थितात चुळबुळ सुरू झाली. काही मंडळी उठून जायला लागली. माणिकराव ठाकरेंचे भाषण सुरू होते, परंतु उपस्थित ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे आर्णीचे नगराध्यक्ष आरीज बेग यांनी ठाकरे यांचे भाषण थांबवून उपस्थितांना कार्यक्रम लवकरच समाप्त होणार आहे, असे म्हणत उपस्थितांना थांबण्याची विनंती केली.
काही लोक थांबलेही परंतु अनेकांनी सभामंडपातून काढता पाय घेतला. याबाबत काही उपस्थितांना विचारले असता माणिकराव ठाकरे आपल्याच जिल्ह्याचे आहे. प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. आता काय करतील, त्यांचे भाषण ऐकूनही काय फायदा असे सांगितले.