मनीषा म्हात्रे। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भायखळा कारागृहात मंजू उर्फ मंजुळा शेट्ये हिला अमानुष मारहाण करण्यात आली असल्याची माहिती आता समोर येत आहे. दोन अंडी आणि तीन पावांचे काय झाले, याचा हिशोब न मिळाल्याने तिला विवस्त्र करून बेदम झोडपले. एवढेच नव्हे तर गुप्तांगात काठी घालून अमानुषतेचे टोक गाठले. यात ती बेशुद्ध पडली. सहा तासांनी शुद्ध आली तेव्हा तिने पाण्याची मागणी केली. मात्र तेही मिळाले नाही. अखेर शौचालयात जाताना ती कोसळली आणि तेथेच तिचा मृत्यू झाला.मंजुळा भांडुपच्या नवजीवन शाळेत शिक्षिका होती. १९९६मध्ये भावजयीच्या हत्येच्या गुन्ह्यात तिच्यासह आईला १४ वर्षांची शिक्षा झाली. दरम्यानच्या काळात आईचा मृत्यू झाला. मंजुळाने १३ वर्षे शिक्षा भोगली होती. तिला तीन महिन्यांपूर्वी येरवडा येथून भायखळा कारागृहात आणण्यात आले. चांगल्या वागणुकीमुळे तिला वॉर्डनची जागा देण्यात आली होती. ती जेलरची मदतनीस होती.शुक्रवारी सकाळी ९ वाजता मंजूने नेहमीप्रमाणे कैद्यांना अंडी व पाव वाटले. या वेळी दोन अंडी आणि ३ पाव कमी पडले. याबाबत जेल अधिकारी मनीषा पोखरकर हिने मंजूला खडसावले. नंतर तिला कारागृहाच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे मनीषाने तिच्याकडे पुन्हा अंडी आणि पावांचा हिशोब मागितला. तिच्याकडून व्यवस्थित माहिती न मिळाल्याने मनीषा पोखरकरसह बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणेने तिला मारहाण केली. मंजूच्या गळ्याभोवती साडी गुंडाळून तिला बरॅककडे आणण्यात आले.लाथा-बुक्क्यांनी तिला मारहाण केली जात असल्याचे आम्ही सुन्न झाल्याचे तक्रारदार महिला कैदी मरियम शेख हिने आपल्या जबाबात म्हटले आहे. मंजूला विवस्त्र करण्यात आले, कोणी केस ओढले तर कोणी तिच्या गुप्तांगात काठी घालून अमानुषतेचे टोक गाठले. मात्र सहाही जणांकडून तिला अमानुष मारहाण सुरू होती. मदतीसाठी पुढे येणाऱ्या प्रत्येकाला तशाच पद्धतीने मारहाण करण्याची धमकी दिल्याने कोणीच पुढे आले नाही, असे मरियमने म्हटले आहे.मंजू बेशुद्ध पडली, पण तरीही मारहाण सुरूच होती. तब्बल सहा तासांनंतर तिला शुद्ध आली. मरियम शेख आणि रंजना हिने तिला शौचालयात नेले. ती तेथेच खाली कोसळली. याची माहिती या दोघींनी तेथे तैनात असलेल्या सुरक्षा अधिकारी महिलांना दिली. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर बराच वेळानंतर तेथे डॉक्टरांनी धाव घेतली. जे.जे. रुग्णालयात नेल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले.
मंजूला विवस्त्र करून जीवघेणी मारहाण
By admin | Published: June 27, 2017 2:30 AM