ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 04 - राज्य महिला आयोगाने मंजुळा शेट्येच्या हत्याप्रकरणी स्वत:हून दखल घेत याचिका दाखल करुन घेतली. तसेच याच्या अधिक तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी)स्थापन केली आहे.
राज्य महिला आयोगाने गठीत केलेल्या एसआयटीत राज्याचे कर्तव्यदक्ष माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यासह निवृत्त न्यायमुर्ती आनंद निरगुडे आणि स्वयंसेवी संस्थेच्या अंजली देशपांडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या तिघांची एसआयटी मंजुळा शेट्येच्या हत्येप्रकरणाची चौकशी करणार आहेत. मंजुळा शेट्येच्या हत्याप्रकरणासह राज्यातील कारागृहातील महिला कैद्यांना पुरविण्यात येणा-या सोयी, सुविधा, आहार, आरोग्य, व सुरक्षितता तसेच अन्य बाबींच्या चौकशीही ही समिती करणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी भायखळा महिला कारागृहात मंजुळा शेट्ये हिला तुरुंग प्रशासनाने विवस्त्र करून अमानुष मारहाण केल्याने त्यातच तिचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. याप्रकरणी कारागृहातील आरोपी गार्ड बिंदू नाइकोडेला विशेष पथकाकडून अटक करण्यात आली. तिला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणातील ही पहिली अटक होती. यानंतर कारागृह अधीक्षक मनीषा पोखरकर यांच्यासह पाच जणांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली.
(मंजुळा शेट्ये प्रकरण; हत्येची महिला आयोगाकडून दखल)
अंडी व पावाच्या हिशेबावरून मंजुळाला अमानुष मारहाण करण्यात आली, त्यातच तिचा मृत्यू झाला. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी सविस्तर वृत्त दिले. त्यानंतर राज्य महिला आयोगाने प्रकरणाची दखल घेतली. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या, सकृतदर्शनी हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे.
तर दुसरीकडे मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीने सत्र न्यायालयात धक्कादायक माहिती दिली. कैदी मंजुळा शेट्येवर पाशवी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती इंद्राणी मुखर्जीने दिली आहे. तसंच मंजुळा शेट्येच्या गळ्याला ओढणी आवळून मारहाण केली. इतकंच नाही तर मंजुळा शेट्येच्या गुप्तांगावर काठीनं हल्ला करण्यात आल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीने केला आहे. शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीवर मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी भायखळा कारागृहात दंगल केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर इंद्राणीने कारागृह प्रशासनाने मारहाण केल्याचा दावा करत विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली होती.