ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - भायखळा महिला कारागृहात मंजुळा शेट्ये हिला तुरुंग प्रशासनाने विवस्त्र करून अमानुष मारहाण केली. त्यातच तिचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. याप्रकरणी कारागृहातील आरोपी गार्ड बिंदू नाइकोडेला विशेष पथकाकडून अटक करण्यात आली. तिला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील ही पहिली अटक होती. यानंतर कारागृह अधीक्षक मनिषा पोखरकर यांच्यासह पाच जणांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल राज्य महिला आयोगाने मंगळवारी घेतली. अंडी व पावाच्या हिशेबावरून मंजुळाला अमानुष मारहाण करण्यात आली, त्यातच तिचा मृत्यू झाला. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी सविस्तर वृत्त दिले. त्यानंतर राज्य महिला आयोगाने प्रकरणाची दखल घेतली. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या, सकृतदर्शनी हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे.
तर दुसरीकडे मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीने सत्र न्यायालयात धक्कादायक माहिती दिली. कैदी मंजुळा शेट्येवर पाशवी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती इंद्राणी मुखर्जीने दिली आहे. तसंच मंजुळा शेट्येच्या गळ्याला ओढणी आवळून मारहाण केली. इतकंच नाही तर मंजुळा शेट्येच्या गुप्तांगावर काठीनं हल्ला करण्यात आल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीने केला आहे. शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीवर मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी भायखळा कारागृहात दंगल केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर इंद्राणीने कारागृह प्रशासनाने मारहाण केल्याचा दावा करत विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली.