जमीर काझी - मुंबई
महानगरात रोज ये-जा करणार्या वाहनधारकांसाठी आता एक खुशखबर आहे. मानखुर्दपासून दक्षिण मुंबईपर्यतचा प्रवास आता त्यांना कोणत्याही अडथळ्याविना पार करता येणार आहे. कारण पांजरपोळ-घाटकोपर (मानखुर्द) जोडरस्त्याचे काम अंतिम टप्यात असून येत्या ५६ दिवसामध्ये पुर्णत्वास येणार आहे.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या पूर्व मुक्त मार्ग (इस्र्टन फ्री-वे) प्रकल्पातील हा २.४ किलोमीटर अंतराचा तिसरा मोठा जोड रस्ता आहे. पांजरपोळपासून घाटकोपर-मानखुर्दपर्यतच्या या मार्गावर लेन मार्क, वीज आणि सिग्नल बसविण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले. इस्र्टन फ्री-वे प्रकल्पातील ऑरेंज गेट ते अणिक आगार (९.२९ किमी) आणि आणिक ते पांजरपोळ (४.३) हे दोन भाग पूर्वीपासून कार्यान्वित आहेत. आणिक-पांजरपोळ जोड रस्त्यावरील दोन बोगदे हे शहरातील पहिले भूयारी मार्ग आहेत. पूर्व मुक्त मार्ग हा गेल्यावर्षी १४ जूनपासून वाहतुकीस खूला केला. त्यावरील मानखुर्दपर्यतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने ऑरेज गेटपर्यतचा मार्ग केवळ अध्र्या तासात पूर्ण करता येणार आहे.त्यासाठी सध्या एक ते दिड तासाचा अवधी लागतो. इस्र्टन फ्री-वे च्या तिसर्या टप्यातील कामाला ऑगस्ट २00९ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. या भागाच्या पूर्ततेसाठी सुरवातीला फेब्रुवारी २0११ पर्यतची ‘डेडलाईन’ निश्चित करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
खैरवाडी उड्डाणपूलाचे काम ही अंतिम टप्यात असून येत्या ३0 मे पर्यत पूर्णत्वास येणार्याची शक्यता आहे. त्यानंतर १,२ आठवड्यामध्ये तो खुला केला जाईल, असे प्राधीकरणाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले.