पुणे : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या पाच गणेश मंडळांनी महापालिकेने तयार केलेल्या हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीच्या साक्षीने हा ऐतिहासिक निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. कसबा गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग मंडळ, गुरुजी तालीम आणि केसरीवाडा मंडळ या पाच मानाच्या गणपतींबरोबरच दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्ट व मंडई मंडळ ‘श्रीं’च्या मूर्तींचे हौदात विसर्जन करणार आहेत. कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी ही माहिती दिली. यंदाची पाणीटंचाई तीव्र असल्यामुळे सध्यातरी हा निर्णय या वर्षापुरताच आहे, त्याला शहरातील अन्य मंडळांचाही प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.शास्त्रीयदृष्ट्या हे योग्य आहे का, या प्रश्नावर शेटे यांनी हिंदू धर्मशास्त्रानुसारच हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले. पार्थिव मूर्तीचे विसर्जन जलतत्त्वात करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार हा निर्णय योग्यच आहे, त्यात काही गैर आहे असे समजण्याचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मानाच्या पाच गणपतींचे हौदामध्ये होणार विसर्जन
By admin | Published: September 26, 2015 3:24 AM