Manohar Joshi: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत, हिंदुजा रुग्णालयाने याबाबत माहिती दिली. जोशी यांना दुपारीच अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गेल्या वर्षीही 86 वर्षीय मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना ब्रेन ट्यूमर झाल्याचे निदान झाले होते. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारली. आता आज पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करावे लागले.
मनोहर जोशी यांचा परिचयमनोहर जोशी शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जात होते. जोशी यांनी 1970 च्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1976 ते 1977 या काळात ते मुंबईचे महापौरही होते. मनोहर जोशी यांनी (1995-1999) काळात राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. पुढे अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी लोकसभा अध्यक्ष (2002-2004) म्हणून काम केले.