सोलापूर : सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. कंपनीचा कारभार मनोज जैनच पाहतो. गेली आठ वर्षे तो कंपनीच्या मुख्य संचालकपदावर कार्यरत आहे. आरोपी मनोज व अजित कामत यांच्या एका कं पनीने या कंपनीत २० कोटी रुपयांची गुंतवणूक २००८ मध्ये केल्याची माहिती मनोज याने दिली़ सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार व त्यांच्या पथकाने मनोज जैन याची एव्हॉन कंपनीत बुधवारी दिवसभर चौकशी केली. या चौकशीत बरीच माहिती समोर आल्याचे सांगण्यात आले़ एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. कंपनीचे सर्व अधिकार मनोज जैनला आहेत. त्याच्या आदेशावरून इफेड्रीनची तस्करी झाली. त्यानेच रायगड व चेन्नई येथे अनधिकृतपणे २१ टन इफेड्रीन विकले. तो राजस्थानचा मूळ रहिवासी आहे. मात्र त्याचे शिक्षण मुंबईत झाले. अनेक वर्षांपासून तो मुंबईलाच वास्तव्यास असल्याचे सांगण्यात आले. कंपनीचे इतर संचालक अमित कामत, राजेंद्र्र कैमल, मनोज जैन, सुनील चित्तोडा, कोमल सुशील तिबरेवाले, जिनत सईद पठाण या कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)
मनोज जैन हाच ‘एव्हॉन’चा मुख्य संचालक अन् कारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2016 4:46 AM