Manoj Jarange Patil Latest News: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला इशारा दिला आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी 'आरपार'च्या उपोषणाची घोषणा केली असून, सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे.
अंतरवाली सराटी येथे बैठकीत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "आपण त्यांना मागण्या लिहून दिल्या आहेत. त्या त्यांनी २९ सप्टेंबरच्या आत सोडवायच्या आहेत. कारण आता आपण थांबू शकत नाही. आपल्या मतदारसंघनिहाय घोंगडी बैठका लागल्या आहेत. सरकारला एवढीच संधी आहे. त्यांनी आपल्या २९ सप्टेंबरपर्यंत सगळ्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत."
"आज एक वर्ष पूर्ण होत आहे. आपण हटणार नाही. आतापर्यंतचे पूर्ण यश हे समाजाच्या पायावर ठेवतो. सगळे श्रेय मराठ्यांचे आहे. एकजूट झाली. माझी एकच अपेक्षा आहे की, प्रश्न सुटतात. फक्त असेच एकजूट रहा. आपल्या शेवटचे आरपारचे उपोषण आपल्याला २९ सप्टेंबरला करायचे आहे. आपल्याला हे राज्यभर करायचे आहे", अशी घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली.
उपोषणाची घोषणा करताच गोंधळ, उपस्थितांचा विरोध
मनोज जरांगे यांनी उपोषण करण्याची घोषणा करताच बैठकीला उपस्थित असलेल्या लोकांनी विरोध सुरू केला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला.
उपोषणाला विरोध करणाऱ्या लोकांना मनोज जरांगे म्हणाले, "आपल्याला हे राज्यभर करायचे आहे. प्रत्येक वेळी असे नका करू. निवडणुका जवळ आल्यावर लय अवघड आहे. या लफड्यात पडायलाच नको."
एक मेला तर फरक नाही पडत - मनोज जरांगे
"आपण पूर्ण राज्य इथे बसवू. हे जरा ठिकाणावर येतील. यांची मस्ती, मग्रुरी कमी होईल, हे जरा समजून घ्या. कारण हे शांततेच्या आंदोलनाला सगळ्यात जास्त भितात. हे रस्त्यावरच्या आंदोलनाला भीत नाहीत. आपण शेवटचे आरपारचे २९ सप्टेंबरला उपोषण करू. काहीही होऊद्या. अरे एक मेला तर फरक नाही पडत. आपली जात मोठी होईल", असे आवाहन जरांगे पाटलांनी केले.