Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: जालना जिल्ह्यातील अंबड येथील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मराठा समाजाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेला मनोज जरांगे यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र, आता मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, त्यासाठी हे सगळे चालले आहे. राज्यात जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत, असा मोठा आरोप मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांना छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यांसंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी बोलताना, ज्यांच्या हातात सत्ता आहे, राज्याचे पालकत्व आहे, घटनात्मक पदावर बसले आहेत, ते अशी विषारी विधाने करून या राज्यात राजकीय स्वार्थापोटी, स्वतःला मुख्यमंत्री करून घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला जो आदर्श घालून दिला आहे, तो विसरून दंगली भडकावयच्या. या राज्यात जातीय दंगली कशा होतील आणि माझी महत्त्वाकांक्षा कशी पूर्ण होईल, यासाठी त्यांनी खूप अटी-तटीचा प्रयत्न चालवला आहे, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला.
मराठा समाज शहाणपणाची भूमिका घेणार आहे
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाज शहाणपणाची भूमिका घेणार आहे. या राज्यात आम्हाला जातीय दंगली करायच्या नाहीत. आरक्षण तर मिळवायचे आहे. मात्र, आता ओबीसी समाजालाही हे लक्षात आले आहे की, आपला वापर करून आता हे स्वप्न बघणार आहेत आणि दंगली घडवणार. मराठा समाजाचे पुरावे सापडले आहेत, तर त्यांना आरक्षण द्यावे लागणार हे गोष्ट त्यांच्याही लक्षात आली आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी नमूद केले.
मी पण सोपा नाही, दिसायला बारीक आहे. पण...
मी पण सोपा नाही. दिसायला बारीक आहे. पण मराठ्यांनी बोलावे एवढी त्यांची लायकी नाही. वैचारिक विरोध करा पण पदाची गरिमा सांभाळा. जातीय तणाव निर्माण करून त्यांना दंगली घडव्याच्या आहेत. पं मी पण त्यांना टप्प्यातच घेणार आहे. सोडणार नाही. लोकांचे खाल्यावर काय होते. हे सगळ्यांनी पाहिले आहे. महाराष्ट्र सदन ओरबाडून खाल्ले. फुले, शाहूंचा आदर्श सोडून ते भरकटले आहेत. पण दंगली घडविण्याचे त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देऊ नका. राज्यात शांतता राहिली पाहिजे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
दरम्यान, पब्लिक समोर दिसल्यावर अंगात किती हवा शिरते, हे दिसले. एका मुरब्बी नेत्याची संस्कृती आणि विचारही दिसले. हे मी पहिल्यांदा पाहिले. एखाद्या नवीन आलेला नेता असता तर ठीक होते. पण प्रसिद्धीसाठी पोटात इतके विषारी विचार ठेवणारा मुरलेला नेता पाहिला नाही, असे टीकास्त्र मनोज जरांगे यांनी सोडले.