जालना – सरकारने ज्यांच्याकडे वंशावळीच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखले देण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने घेतलेला निर्णय चांगला, परंतु वंशावळ या शब्दाऐवजी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, सरकारने काढलेल्या परिपत्रकात सुधारणा करा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी उपोषण आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे गेल्या १० दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण मिळावे यामागणीसाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून ठिकठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.
आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे म्हणाले की, ज्या मराठा समाजाकडे कुणबी असल्याच्या नोंदी असतील त्यांना आजपासून दाखले दिले जातील. एकूण मागण्यांपैकी एक महत्त्वाचा विषय आहे. परंतु मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही आमची मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घेतलेला निर्णय चांगला आहे. त्याचं मराठा समाजाकडून कौतुक आहे. परंतु ज्यांच्याकडे वंशावळाची नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल अशी अट आहे. परंतु आमच्याकडे कुणाकडे वंशावळाचे पुरावे नाहीत. धाडस आणि निर्णय घेण्याची क्षमता मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्र्यांनी दाखवली त्याचं कौतुक, परंतु झालेल्या निर्णयाचा फायदा समाजाला होणार नाही. निर्णय चांगला पण त्यात सुधारणा करा असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत महाराष्ट्रातील मराठा समाजाने कालचा निर्णय मान्य केला, परंतु जिथे वंशावळीचा शब्द आहे तिथे सुधारणा करा. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, वंशवळी आमच्याकडे नाही, आमची मागणी ती नाही. निर्णयात सुधारणा करावी ही आमची मागणी आहे. सरकारने काढलेला जीआर आम्हाला मान्य, पण त्यात सुधारणा करा. सरकारने आम्हाला फसवलं हे आम्ही म्हणत नाही. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, वंशावळ हा शब्द काढून सरसकट हा शब्द वापरा. महाराष्ट्रात मराठा समाजाचे जे आंदोलन सुरू आहे. आपले आंदोलन लोकशाही मार्गाने आहे. आमचे आंदोलन शांततेत आहेत. आजही हल्ल्यात जखमी झालेले मराठा बांधव रुग्णालयात उपचार घेतायेत. आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू राहणार आहे अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली.
दरम्यान, सरकारने आमची भावना समजून घ्यावी, आमच्या लेकरांना होणारा त्रास, युवकांच्या आत्महत्या, आम्ही सरकारचे दुश्मन नाही, आजपर्यंत अनेक बळी गेलेत. त्यामुळे जाता जाता तुमच्या निर्णयाचा आम्ही स्वागत केले. परंतु वंशावळीच्या जागेवर सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी सुधारणा करा. सुधारित जीआर आमच्याकडे घेऊन या. ७० वर्षात कुणी केले नाही या सरकारने केले असा आशीर्वाद तुम्हाला लागेल. त्यामुळे आणखी १-२ दिवस घ्या, सुधारणा करून नवीन जीआर काढा असंही जरांगे यांनी सांगितले.