Manoj Jarange Patil News: आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की, उमेदवार पाडायचे, याचा निर्णय मनोज जरांगे पाटील घेणार आहेत. यासंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत असून, राज्यभरात विविध ठिकाणी दौरे करत आहेत. शांतता रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करताना दिसत आहेत. यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांना न्याय द्यायचा नाही, असे ठरवलेले दिसत आहे. त्यामुळे गोरगरिबांनी ठरवले आहे की, त्यांना खुर्ची द्यायची नाही. २० तारखेपर्यंत चित्र बदललेले दिसेल. तुम्हाला माझी भाषा कळत नाही. तुम्हाला आरक्षणावर मार्ग काढायचा नाही. सगेसोयरेबाबत अंमलबजावणी करता येत नाही, या शब्दांत मनोज जरांगे यांनी निशाणा साधला.
मराठा समाजाला दोनशे वर्षांपासून ओबीसी आरक्षण
छगन भुजबळ यांना काहीच कळत नाही. मराठा समाजाला दोनशे वर्षांपासून ओबीसी आरक्षण आहे. छगन भुजबळ आता ओबीसी आरक्षणामध्ये गेलेला आहे. छगन भुजबळ मला शिकवतो आणि म्हणतो मला खूप अनुभव आहे. कशाचा अनुभव आहे, असा सवाल करत मनोज जरांगे यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला. तसेच मी राजकीय भाषा बोलत आहे. कारण तुम्ही आरक्षण देत नाही. तुम्ही आरक्षण द्या, मी राजकीय भाषा बंद करतो, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षणाचा विषय रखडला. देवेंद्र फडणवीस यांनी काही राजकीय गणित बांधली आहेत. ती फेल होणार आहेत. त्यांना पश्चाताप होणार आहे. तुम्हाला समजून घ्यायचे नसेल तर माझाही नाईलाज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले तर मराठे त्यांना डोक्यावर नाचतील. तुम्ही आरक्षण दिले नाही तर आम्ही तुमचे राजकीय गणित बिघडवणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी मला हसण्यावर घेऊ नये. नाहीतर त्यांचा बोऱ्या वाजेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.