“देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 01:51 PM2024-07-14T13:51:33+5:302024-07-14T13:52:19+5:30

Manoj Jarange Patil News: अजित पवारांचे काही पालकमंत्री मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र करत आहेत. २० तारखेपासूनचे आमरण उपोषण कठोर असेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

manoj jarange patil allegations that devendra fadnavis may be pressuring maratha community not to get reservation | “देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील”: मनोज जरांगे

“देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: एक महिना झाला. वेळ संपला. मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या, असे आवाहन सरकारला करतानाच मी पुन्हा २० जुलैपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार असून, त्याच दिवशी हे २८८ उमेदवार पाडायचे की आपण उभे करायचे हे ठरवू, अशी पुढील रणनीती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घोषित केली. यानंतर आता सरकारची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांचे नाव घेऊन पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आरोप केले आहेत.

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या पक्षाचे दोन-तीन पालकमंत्री मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र करत आहेत. दिलेल्या मुदतीत आरक्षण न मिळाल्यास त्याचा दोष सरकारला देऊन उपयोग नाही. सरकारवरचा आमचा विश्वास उडाला आहे, असे कधीही म्हटले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून इतर मंत्र्यांवर दबाव आणत असतील, असा मोठा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. 

त्यांना छगन भुजबळ गरजेचे आहेत

आम्हाला जे काही दिसत आहे, त्यावर काम करणे गरजेचे आहे. मला आमचा समाज महत्त्वाचा आहे. एक महिन्याचा वेळ दिला होता. या महिन्यात काय केले, हे आमच्या लक्षात आले आहे. आम्हाल १३ तारखेपर्यंत आरक्षण मिळाले नाही, हेच दिसत आहे. आम्ही संयम बाळगला आहे. जर तसे नसते, तर शंभुराज देसाईंचा शब्द पाळला नसता. देवेंद्र फडणवीस करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील. कारण त्यांना छगन भुजबळ गरजेचे आहेत, या शब्दांत मनोज जरांगे यांनी निशाणा साधला. १३ तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिले नाही, ते आता कसे मिळवायचे ते आम्ही पाहतो, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 

दरम्यान, मराठ्यांच्या चुका काढायच्या आणि स्वतःच्या जातीचा उदोउदो करायचा, हे चुकीचे आहे. समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. २० तारखेपासूनचे आमरण उपोषण कठोर असणार आहे. गेले दहा ते अकरा महिने आम्ही संयमाने घेत आहोत. पण त्याचे परिणाम दिसत आहेत. मी उपोषण करावे, अशी समाजाची इच्छा नाही, पण मी त्यांचे मन बदलेन. समाजासाठी बलिदान देण्यास तयार आहे. समाज मोठा झाला पाहिजे. समाज सुखी झाला पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: manoj jarange patil allegations that devendra fadnavis may be pressuring maratha community not to get reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.