बारामती - मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आधीपासून वेळ दिला आहे. जरांगे पाटलांनी खूप सहन केले आणि सरकारचे ऐकूनही घेतले आहे. त्यामुळे आता मात्र मनोज जरांगे पाटील आणि समाजाची फसवणूक करायचे पाप हे ट्रिपल इंजिनचे खोके सरकार करतंय अशी शक्यता नाकारता येत नाही असं सांगत सुप्रिया सुळेंनी सरकारवर आरोप केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तारीख पे तारीख अशाप्रकारे मनोज जरांगे पाटलांना सातत्याने टाळलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असतानाचे विधान पाहिले. जेव्हा एखादी गोष्ट करायची नसती तेव्हा तारीख पे तारीख नाहीतर कमिटी आणि रिपोर्ट करायचे. हा फडणवीसांचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तुम्हाला हवा असेल तर देते असं सांगत सुळे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तसेच आरक्षणाचा जेव्हा मुद्दा आला आणि सरकारने शब्द दिला तेव्हाच सरकारने तातडीने सर्वेक्षण करणे गरजेचे होते. आता काहीतरी धावपळ करून जे काही करतायेत ते दुर्दैव आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीम समाजाला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे कुठलाही चुकीचा रिपोर्ट देऊन यावर अन्याय होऊ नये. आताचे जे काम महाराष्ट्र सरकार अर्धवट करतेय. त्यामुळे खोटारडा रिपोर्ट काढून सरकारने कुठल्याही समाजाला फसवू नये असंही सुप्रिया सुळेंनी सरकारला म्हटलं.
दरम्यान, लोकशाहीत आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासह असंख्य लोक आज मुंबईच्या दिशेने येतायेत. हे सर्वजण शांततेच्या मार्गाने मुंबईत येतायेत. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाने त्यांना सहकार्य केले पाहिजे. जे लोक मुंबईत येतायेत त्या सर्वांचे स्वागत केले पाहिजे. या आंदोलकांना ज्या काही सुविधा लागतील त्या प्रशासनाने, सरकारने त्यांना पुरवल्या पाहिजेत कारण ही लोकशाही आहे असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.