Manoj Jarange Patil Appeal Devendra Fadnavis: मराठा आरक्षणावरून राज्यातील परिस्थिती चिघळत असताना या मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शरद पवार, देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे यांच्यासह सर्वपक्षीय नेते या बैठकीला उपस्थित होते. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखणे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत झाले. याबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत, असा ठराव मांडण्यात आला. त्यावर बैठकीतील सर्व नेत्यांनी स्वाक्षरी केली. मात्र, या बैठकीवर प्रतिक्रिया देताना आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट करत, देवेंद्र फडणवीसांनी चर्चेसाठी यावे, असे म्हटले आहे.
मराठा समाजाने संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. माझी मनोज जरांगेंना विनंती आहे. आमचा प्रामाणिकपणा त्यावर त्यांनी विश्वास ठेवावा. मराठा समाजाच्या आंदोलनाला वेगळी दिशा मिळाली आहे. सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे मराठा समाजाने शांतता ठेवावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर केले आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीसांनी चर्चेसाठी यावे
आम्ही चर्चेला चार दिवसांपासून बोलवत आहोत. पण ते येत नाही. त्यामुळे मराठ्यांमध्ये दम निघत नाही. मराठे तापट आहेत. तुम्हाला आरक्षणासाठी वेळ हवा असेल तर मला बोलता येतेय तोवर चर्चेसाठी या. तुम्हाला किती वेळ हवाय ते सांगा. देवेंद्र फडणवीसांनी चर्चेसाठी यावे, रस्त्यांवर तुम्हाला कोणीही अडवणार नाही. माझे मराठा तुम्हाला संरक्षण देतील. पण संध्याकाळपासून मी पाणीही सोडणार आहे, मग बघू मराठ्यांना कसे आरक्षण देत नाहीत, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
कशासाठी आणि किती वेळ हवाय हे सरकारने सांगावे
सरकारने आता वेळ मागितला आहे. उपोणषाला बसून ७-८ दिवस झाले. पण, आता सांगत आहेत की वेळ हवा आहे. कशासाठी आणि किती वेळ हवाय हे सरकारने सांगावे. मग समाजाशी बोलून वेळ द्यायचा की नाही ते ठरवेन.बैठकीतील तपशील पाहण्याची माझी इच्छा नाही. गोर गरिबांच्या पोरांना अन्याय सहन करावा लागत असातना हे नेते हसण्यावारी नेत आहेत. यांना जनता सांभाळणारे सरकार म्हणायचे का, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.
दरम्यान, या चर्चेतून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका जी सरकारची आहे ती सर्वपक्षीय नेत्यांचीही आहे. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे दिले पाहिजे ही भावना सर्वांनी व्यक्त केली. तशाप्रकारचा ठराव करण्यात आला. इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही भूमिका सर्वांची आहे. कायदेशीर बाबी तपासून त्यावर साधक बाधक चर्चा झाली. या प्रक्रियेला वेळ द्यावा लागेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.