Manoj Jarange Patil: मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आहेत. त्याला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. याशिवाय कुणबी नोंदी आणि शिंदे समिती रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. यानंतर इंदापूर येथे झालेल्या ओबीसी एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर बोचरी टीका केली. या टीकेला मनोज जरांगे यांनी उत्तर देताना मोठे विधान केले आहे.
छगन भुजबळ प्रत्येक जागेवर जाऊन जातीय तेढ निर्माण होईल, अशी विधाने करत आहेत. दंगली भडकतील, ओबीसी आणि मराठा समाजात वाद होईल, अशी विधाने करत आहेत. आम्ही गाव खेड्यातले गोरगरीब मराठे आणि गोरगरीब ओबीसी बांधव आम्ही आजही एकमेकांवर प्रेम करतो, एकमेकांच्या सुख-दु:खात जातो. यांचे स्वप्न आहे, यांना दंगल घडवायची आहे आणि राजकीय फायदा उचलायचा आहे. मी गावागावात जाऊन मराठा बांधवांना शांत राहण्याचे आवाहन करत आहे. आपल्याला जातीय तेढ निर्माण करायचा नाही. जे काम प्रशासन करते आहे, तेच काम आम्ही शांततेचे काम करत आहोत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना मनोज जरांगे यांनी मोठे वक्तव्य केले.
...तर देशातील संपूर्ण ओबीसी आरक्षण एकाच दिवसात रद्द होऊ शकते
छगन भुजबळ म्हणतील तसा कायदा चालत नसतो. शासकीय नोंदी रद्द होत नसतात. कुणबी नोंदी रद्द केल्या तर ओबीसींचे सगळे आरक्षण रद्द होईल. देशातील सर्व ओबीसींचे आरक्षण रद्द होऊ शकेल. आमचे पुरावे असून रद्द होत असतील तर त्यांचे आरक्षण तर कशाच्याच आधारावर दिलेले नाही. जात म्हणून दिलेले आरक्षण आणि व्यवसाय म्हणून दिलेले आरक्षण मग राहत नसते. आमचे तर पुरावे आहेत. पण तसे होत नसते. कायदा कायद्याच्या जागेवर असतो, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, छगन भुजबळ मंत्री झाले आहेत. ते मंत्रीपदाचा गैरवापर करत आहेत. गोरगरिबांवर केस करायला लावतात. ते म्हणतील तसे होणार नाही. या अधिवेशनातच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदा पारित होईल. शंभर टक्के, त्यांनी २४ डिसेंबरपर्यंत वेळ घेतला आहे. नाही झाली तर आम्ही लढायला सज्ज आहोत. मराठा समाजाच्या शासकीय नोंदी मिळाल्या आहेत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.