Manoj Jarange Patil Criticized Chhagan Bhujbal: दोन समाजात वाद लावण्याचे काम सुरू आहे. आम्ही मराठ्यांनी हे सुरू केले नाही. ओबीसी आंदोलनामगे येवलेवाले आहेत. त्यांनीच दोन जणांना हाताशी धरून उभे केले आहे. तुम्ही आमची शाळा करणार का, राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही तर नाव बदलतो, मग तुम्ही किती पळता ते पाहतो, या शब्दांत मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमच्या भविष्याचे वाटोळे केले. लोकांना आंदोलनाला बसवायचे जमते. वाहने पुरवली जात आहेत. गाव-खेड्यांमध्ये आम्ही एक आहोत. जे लढत आहेत, त्यांनाही कळत नाही की आपण कुणासाठी लढत आहोत. ते राजकारणी आहेत. राजकीय फायद्यासाठी हे सगळे सुरू आहे. निवडणूक झाल्यावर बघू, असे सांगत होते. आम्हीही आता निवडणूक झाल्यावर पाहतो. आम्हाला जातीय तेढ नको, म्हणून आम्ही शांत आहोत. परंतु, तुम्ही खोटे बोलणार असाल, कुणबी नोंदी रद्द करा, अशी मागणी करणार असाल, तर मग आम्हीही बघून घेतो, मराठ्यांनो सावध व्हा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
सरकार कसे आरक्षण देत नाही, तेच आता पाहू
ताकदीने आरक्षण घेणार. सरकार कसे आरक्षण देत नाही, तेच आता पाहू. तेच लोकांना फोन करून आंदोलनाच्या ठिकाणी जायला सांगत आहेत. तिथे जाऊन जातीय तेढ निर्माण करा, हे तेच येवलेवाले करत आहेत. असे आंदोलन करतात का, आम्ही आंदोलन सुरू केल्यावर आमच्यासमोर तुम्ही कुणी उभे करणार. तुम्ही आम्हाला खिंडीत पकडण्याचे काम करत आहात. आम्ही ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचे नाही, असे ठरवल्यास यांना किती वाईट वाटेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, १३ तारखेपर्यंत काय निर्णय होतो, ते पाहू द्या. सरकार ओबीसी आंदोलनाच्या दबावात येऊन मराठ्यांवर अन्याय करणार का, सरकार पहिल्यासारखेच वागणार का, ते आता पाहायचे आहे. मराठ्यांची राज्याला गरज आहे की नाही, परत सरकारला दाखवून देतो. मग कोणाला पाडणार, ते सांगतो, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला.