Manoj Jarange Patil News: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलिसांची पथकांनी महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात त्याचा शोध सुरू केला आहे. पण, अजूनही त्याचा पत्ता लागलेला नाही. यामुळे आता पोलिसांनी कृष्णा आंधळे यांला वान्टेड घोषित केले आहे. तर दुसरीकडे वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड प्रकरणावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील पहिल्या दिवसापासून आक्रमक झाले आहेत. बीड प्रकरणावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकावर टीका केली आहे.
मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सगळ्यात मोठा गु्न्हेगार आहे. देशमुख कुटुंब तुमच्या घरी आले, त्या कुटुंबाचा अपमान होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये. या प्रकरणातील एक आरोपी जरी सुटला तरी देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. न्यायदेवता न्याय करेल आणि आरोपींना फासावर लटकवेल, अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.
गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यांना पाठीशी घालणार असाल तर हा महाराष्ट्राला कलंक
गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यांना पाठीशी घालणार असाल तर हा महाराष्ट्राला कलंक आहे. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर मराठा समाज शांत आहे. मुख्यमंत्र्यांना आपले कुटुंब म्हणून देशमुख कुटुंबाकडे पाहावे लागणार आहे. तुम्ही जर एखाद्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही. मी संतोष देशमुख यांना न्याय मागतो तर मी जातीयवादी आहे का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांना देखील सहआरोपी केले पाहिजे. सांभाळणाऱ्यांना सहआरोपी करत नाहीत. सरकार यांना पाठीशी घालत आहे का? मुख्यमंत्री, एसआयटी, सीआयडी, आणि पोलिस प्रशासनाकडून एक आशा आहे ते एकाही आरोपी सुटू देणार नाहीत. या गुंडाचे राज्यात खूप मोठे नेटवर्क आहे. राज्यात खूप मोठी साखळी आहे, ते संपूर्ण बाहेर काढून त्यांना अटक करायला हवी. हे मुख्यमंत्री करतीलच. नाहीतर आम्ही राज्य बंद पाडू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.