Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत असून, राज्यातील ठिकठिकाणी ते सभा घेत आहेत. मराठा आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांना अटक करावी कारण ते हिंसा घडवतील, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. यावर प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समज द्यावी, अशी विनंती केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझी विनंती आहे, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना समज द्यावी. ते त्यांचे कार्यकर्ते आमच्या अंगावर घालत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि फडणवीसांना मी सांगतोय की, तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या हेच कार्यकर्ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. मराठ्यांना विरोध करायचा त्यांनी बंद करावे. मराठ्यांना आरक्षण द्या आम्ही ट्रकभर गुलाल घेऊन दिल्लीत येतो, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
आरक्षणाचा दिवस जवळ आला आहे
मराठा भावांना सांगू इच्छितो की, आरक्षणाचा दिवस जवळ आला आहे. आपण २२ ऑक्टोबर रोजी पुढील दिशा ठरवणार आहोत. २४ ऑक्टोबरपर्यंत सरकारकडे मुदत आहे. आपले आंदोलन शांतेत होईल. शांततेच्या आंदोलनामुळेच मराठा समाज एकवटला आहे. त्यामुळे मराठ्यांच्या पुढच्या आंदोलनाची दिशा २२ तारखेला ठरवणार. सरकारला विनंती आहे की लाखांनी जमलेल्या मराठा समाजाची भावना लक्षात घ्या आणि मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची असेल, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांना यश मिळवायचे होते तेव्हा त्याने एक मराठा लाख मराठाची घोषणा आझाद मैदानात दिली होती. आता एक लाख मराठे एकत्र आले आहेत, त्यांचे भले होतेय तर सांगतायत की हिंसा घडवणार आहे. मला सांगा आता मला अटक करणे हे इतके सोपं आहे का? मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात तुम्हीच गेलात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज द्यावी. तो तुमचा कार्यकर्ता आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझे सांगणे आहे तो तुमचा कार्यकर्ता आहे, तुम्ही मराठ्यांना अंगावर घेऊ नका. याच मराठ्यांनी तुम्हाला १०६ आमदार निवडून दिले आहेत हे विसरु नका. केंद्रात आणि राज्यात सत्ता आणण्यात मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.