Manoj Jarange Patil News: लोकसभा निवडणुकीचा एक एक टप्पा पुढे सरकत आहे, त्याप्रमाणे प्रचाराचा जोर वाढताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील सभांवर भर देताना दिसत आहेत. यातच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे करत असून, अद्यापही लोकसभा निवडणुका झाल्या की, पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात एक अल्टिमेटमही मनोज जरांगे यांनी दिले आहे. मराठा ताकदीने एकत्र आला. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला आहे, अशा आशयाचे विधान मनोज जरांगे यांनी केले आहे.
एका सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा ताकदीने एकत्र आला आहे. देशाने धास्ती घेतली आहे. एकीची भीती एवढी बसली आहे की, चांगल्या चांगल्याने गुडघे टेकावे लागत आहेत. मराठा एक झाला म्हणून राज्यात अनेक टप्प्यात निवडणूक लागली आहे. दुसरीकडे एक आणि दोन टप्प्यात निवडणुका होत आहे. हाच मराठ्यांचा विजय आहे. भाजपाला आमचा कधीही विरोध नव्हता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
पाच पिढ्या घरी बसले पाहिजे, असे पाडा
या लोकसभा निवडणुकीत असे पाडा की, पाच पिढ्या घरी बसले पाहिजे. माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास दिला तर पुढच्या दहा पिढ्या हे मराठे तुमच्या कपाळाला गुलाल लावणार नाहीत. दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका, ही शेवटची संधी आहे तुम्हाला. जात महत्वाची आहे, तो आपल्यासोबत आला नाही तर त्याला जिल्हा परिषद ,सरपंच पदाला पाडा. मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, परिणाम भोगावे लागतील. मोदी इथे मुक्कामी आहे. मराठा कुणबी कायदा पारित नाही केला तर विधानसभेला बघतो, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.