Manoj Jarange Patil ST Strike News: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात संप पुकारला आहे. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांचे हाल झाले. यातच एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कामगार कृती समितीत एक बैठक होणार आहे. त्यात तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मंत्री उदय सामंत यांच्यासह एक बैठक झाली. परंतु, ती निष्फळ ठरली. यानंतर आता मराठा आरक्षणाची आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी एसटी आंदोलनावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचे हाल देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या सरकारपासून चालवले आहेत. आता त्यांचे सरकार आहे, तरीही एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. सर्वांची सेवा करणारा एसटी कर्मचारी आहे. त्यांचे प्रश्न का ऐकले जात नाहीत. त्यांचा पगार का वाढवू नये. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या का मान्य केल्या जात नाहीत. त्यांना घरे, मुलं-बाळं नाहीत का, त्यांना संसार नाही का, एसटी कर्मचारी त्याचा संसार सोडून जनतेची सेवा करत आहे. त्याचा संसार तुम्ही बुडवायला लागले आणि तुमचा सरकारचा संसार मोठा करायला लागले. तुम्ही तुमचे लोक आंदोलनात घुसवले, असा मोठा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
...तर सरकारचा कार्यक्रम संपवणार
एसटी कर्मचाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर सरकारचा कार्यक्रम संपवणार. फडणवीस यांनी आंदोलनांमध्ये पेरलेले लोक आता समस्यांना वाढवण्याचे काम करत आहेत. आता लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक झालीच पाहिजे, नाहीतर हा संघर्ष थांबणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांना सरकारसमोर मांडण्याचे आणि त्यांची तातडीने सोडवणूक न झाल्यास संघर्षाला पुढे नेण्याचे इशारा दिला आहे.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी सरकारकडे तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. निसर्गाने शेतकऱ्यांशी दगा फटका केला आहे, परंतु सरकारने दगा करू नये. सरकारने जर शेतकऱ्यांना वेठीस धरले, तर आम्ही सरकारचा कार्यक्रम लावल्याशिवाय थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.