लातूर - छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर यांनी आता थांबावे, जातीय तेढ निर्माण होईल असं बोलू नये.कारण जातीय तेढ निर्माण करून काही मिळणार नाही. माझी त्यांना शेवटची विनंती आहे. तुम्ही जीभेला आवर घाला. तुमच्यामुळे मराठा-ओबीसी बांधवांमध्ये चांगले संबंध असताना हे खराब करू नका.कारण राज्यात शांतता आणि सलोखा राहिली पाहिजे. गावखेड्यातील मराठा-ओबीसी एकमेकांच्या मदतीला धावतात. तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी गोरगरिबांमध्ये झुंज लावू नका असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी लातूर इथं सभा घेतली. त्यानंतर माध्यमांसमोर जरांगे म्हणाले की, तुम्ही धीराने घेतले तर बरे होईल. एकमेकांच्या मदतीला जायचे आहे. जातीय तेढ निर्माण करून तुम्ही त्याचा राजकीय फायदा उचलू शकाल पण आपलाच कुणीतरी नातेवाईक त्याला दु:खात ढकलू नका. देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आले पाहिजे की राज्यात शांतता राहिली पाहिजे. आपण सरकार चालवताय. फडणवीसांनी जो जो शब्द दिला त्याचा सन्मान मराठ्यांनी केला आहे. मराठा समाज शांत राहिला आहे. गुन्हे मागे घेतो असंही फडणवीस म्हटले तरी अटक सुरूच आहे. नेमका तुमच्या मनात डाव काय याचे स्पष्टीकरण फडणवीसांनी दिले पाहिजे असं त्यांनी सांगितले.
तसेच तुम्हाला थांबायचे नसेल तर आम्ही तुम्हाला ओळखले आहे. तुम्ही मराठ्यांशी खेटू नका. ही धमकी आणि इशारा नाही. कारण याच मराठ्यांनी तुम्हाला १०६ आमदार दिलेत. त्याची परतफेड तुम्ही डाव टाकून मराठ्यांना संपवू नका. तुमचे ५-७ लोक आहेत जे नेहमी मराठ्यांवर गरळ ओकत आहेत. जर तुम्हाला याचे गांभीर्य नसेल तर याचे परिणाम तुम्हाला २४ डिसेंबर नंतर दिसतील. जर २४ डिसेंबरपर्यंत तुम्ही आरक्षण नाही दिले आणि हे बुजगावणे थांबवले नाहीत तर यांना उठवायला आम्हाला वेळ लागणार नाही. तुम्ही या लोकांना आवरा, २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या. गोड बोलायचे आणि डाव टाकायचे असं फडणवीस करतायेत. आता पहिल्यासारखा मराठा राहिला नाही.मराठे स्वत:च्या लेकरांसाठी एकजूट झालेत त्यामुळे ते कोणत्याही टोकाला जावू शकतात याचे भान ठेवून गांभीर्याने निर्णय घ्या. छगन भुजबळांचे एकट्याचे ऐकून तुम्ही निर्णय घेणार असाल तर याचे परिणाम १०० टक्के भोगावे लागणार असंही मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटलं आहे.
दरम्यान, गोपीचंद पडळकर हे सामाजिक चळवळीतील आहेत. त्यांच्याबद्दल आमच्या मनात आकस नाही. त्यांनीसुद्धा मराठा समाजाबद्दल आकस ठेऊ नये. समाजाच्या दु:खाची जाण त्यांना आहे. एकनाथ शिंदे ज्या वेळीस बोलले ते त्यांनी केले आहे. शिंदे जेव्हा चुकले तेव्हा आम्ही बोललो आहे. आता शिंदेंनी २४ डिसेंबरपर्यंत आमच्याकडून वेळ घेतला आहे. आतापर्यंत ३५ लाख घरापर्यंत आरक्षण दिलेय, समिती काम करतेय. काही ठिकाणी अधिकारी मराठ्यांच्या नोंदी सापडू देत नाही. जातीय रंग देतायेत त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. एकनाथ शिंदे हे मराठ्यांना आरक्षण देतील असा विश्वास आहे. परंतु त्यांनी नाही दिले तर मुख्यमंत्र्यांविरोधातही दंड थोपटायला आम्ही तयार आहोत असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.