जालना - Manoj Jarange Patil ( Marathi News ) मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून राज्यभरात आंदोलन सुरू होणार आहे. त्यात विरोधात बोलणाऱ्या छगन भुजबळ, विजय वडेट्टीवारांवर मनोज जरांगे संतापले. मराठ्यांनी मनावर घेतले तर तुमच्या सर्वांचा सुफडा साफ करू शकतो असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार नाही का? तू कोण आम्हाला विचारणार, दरदिवस शांततेत आंदोलन करून सरकारला निवेदन देऊ शकतो. परीक्षा पुढे ढकला असं बोललो नाही. याला वेळेवर गोळ्या द्या. परीक्षा ठेवा. विद्यार्थ्यांना अडचण येता कामा नये असं बोललो. मला नेता व्हायचं नाही तूच हो. ओबीसी समाजाला छगन भुजबळ सर्वात मोठा डाग लागलाय. मारुतीचे शेपूट तुझ्याकडेच येणार आहे असं प्रत्युत्तर जरांगेंनी भुजबळांना दिले.
तर मराठ्यांवर टीका कर असं राहुल गांधींनी सांगितलंय का? विरोधी पक्षनेतेपद तुझ्या घरातलं आहे का? जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते पद दिलंय. राहुल गांधी अशा व्यक्ती कशाला निवडतात माहिती नाही. तू एका जातीचा विरोधी पक्षनेता आहे का? आमचा दम बघायला गेले तर तुला सापडणार नाही. सगळा सुफडा साफ होईल नीट राहा. मराठ्यांनी मनावर घेतले तर तुमच्या सगळ्यांचा सुपडा साफ करू शकतो असं सांगत मनोज जरांगे यांनी विजय वडेट्टीवारांना टोला लगावला.
दरम्यान, सरकार एखादा डाव आखू शकतो, विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुडवणार आणि आरोप लावणार, लढणाऱ्या बदनाम करावे लागते हे सरकार करणार आहे. माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे. देवाइतकीच निष्ठा माझी समाजावर आहे. कुटुंब सोडून मी इथं बसलो नसतो. मी ऐकत नाही, मॅनेज होत नाही. समाजाला न मिळणारं आरक्षण देतोय म्हणून बदनाम करणारे लोक पुढे आणलेत. बदनाम करणाऱ्यांचा इतिहास तोंडाने सांगण्यासारखाही नाही असा आरोप जरांगेंनी केला.
सावधगिरी म्हणून रास्ता रोकोचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा
उद्यापासून गावोगावी रास्ता रोको करावा. दरदिवशी रास्ता रोको करून सगेसोयरे अधिसूचनेचे अंमलबजावणी करण्याची मागणी करावी. रोज सकाळी १०.३० ते १ आंदोलन करा. आंदोलनाच्या चारही बाजूला कॅमेरे लावा. जाळपोळ किंवा आंदोलनाला डाग लावण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर ते रेकॉर्ड होईल. राज्यभर प्रत्येक गावात रास्ता रोको करावा. सावधगिरी म्हणून रेकॉर्डिंग करा, ३ मार्च रोजी जिल्ह्याच्या एकाच ठिकाणी, एका वेळी रास्ता रोको करण्याची ताकदीने तयारी करा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.