छत्रपती संभाजीनगर - आम्ही ओरबडत नाही, तर हक्काचं आरक्षण मागतोय. मराठा आणि कुणबी एकच आहे. सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही. जर तसे केले तर सरकारला महागात पडेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, कुणबी नोंदी खोट्या नाहीत, नोंदी सापडल्या असूनही त्या खोट्या ठरवणार आणि मराठ्यांवर अन्याय करणार, सरकार तुमचे, मंडल कमिशननं १४ टक्के आरक्षण दिले त्याचीही चौकशी करा. ज्या नेत्यांनी १९८४ ला आरक्षण दिले त्यांच्यावरही कारवाई करा. जातीयवाद हे सरकारच वाढवतंय. आम्ही बोललो तर आम्हाला जातीयवादी ठरवणार, आमच्या ५७ लाख नोंदी आढळल्यात. तुम्हीही कसेही वागा, खोड्या तुम्ही काढायच्या आणि आमच्या मागे लागायचे अशी परिस्थिती आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मी मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. वेळेप्रसंगी मला बलिदान देण्याची वेळ आली तरी मी देईन, पण मी भीत नाही. मला काही शिकवू नका, माझा समाज पाठिशी आहे. गोरगरिब मराठ्यांची पोरं पुढे जायला हवी. मराठा समाज एक झाला म्हणून प्रचंड पोटदुखी झालीय. आमच्या जातीला तुम्ही चिल्लर समजता का? असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला विचारला.
दरम्यान, छगन भुजबळांना मराठा आणि धनगर यांच्यात भांडणे लावायची आहेत. गोरगरिब धनगर आणि गोरगरिब मराठ्यात वाद लावून भुजबळ घरी बसणार आहे. मी आतापर्यंत एकाही धनगर नेत्यांना काही बोललो नाही, याचा अर्थ त्यांनी काहीही करावं असं नाही. तुम्ही आमच्या वैयक्तिक जीवनात घुसला, आम्ही कधी तुमच्या आयाबहिणींवर गेलो नाही. राजकारण असो वा समाजकारण वैयक्तिक कुणी बोलत नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
आमच्या ताटातलं आम्हाला द्या
आमच्या ताटातलं आम्हाला द्या, आमच्या ताटातल्या भाकरी घेऊन पळालेत. छगन भुजबळांनी कितीही विरोध केला तरी मराठ्यांनी एकाही जातीच्या अंगावर जायचं नाही. जातीवाद करणं, सभेतून व्यासपीठावरून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं हे सगळं करतोय तो छगन भुजबळ, मराठ्यांना ५० टक्क्याच्या आत आरक्षण द्या. ओबीसीतील २७ टक्क्यात स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.