पुणे - आम्ही गावखेड्यात जाऊन सांगणार, भुजबळांना थांबवा, आम्ही मंडल कमिशनला आव्हान करू. आमचे आरक्षण ३ वेळा घालवण्याचा प्रयत्न झाला. आमच्याबद्दलचा आकस भुजबळांनी सोडून द्यावा. तुम्ही जे काही केले मराठ्यांच्या विरोधात केले. प्रत्येकवेळी आकसच व्यक्त करावा असे नाही. पण ते थांबतच नसतील तर आमचा नाईलाज आहे. स्वत:च्या स्वार्थापोटी आव्हानाची भाषा करतायेत. पुढे काहीही होऊ शकते असा प्रतिइशारा मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला कुणाचे वाटोळे करायचे नाही. आमच्या नोंदी सापडल्या तरी मागच्या दाराने आलो असं म्हटलं जाते. मराठ्यांच्या ओबीसीमधील नोंदी सापडल्या. आमच्या सापडलेल्या नोंदींना चॅलेंज होऊ शकत नाही. ५७ लाख लोकांना चॅलेंज करावे लागेल. शिक्षण, नोकरीत ओबीसी आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे यासाठी आमची लढाई आहे. जिथे जिथे ओबीसींचा फायदा होतो तिथे मराठ्यांचा फायदा झाला पाहिजे. जर ओबीसीत आम्हाला राजकीय आरक्षणाचा फायदा होत असेल तर का घेऊ नये? असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला. तसेच आम्हाला जे आता पाहिजे ते आधी होऊ द्या. बाकीच्यावर आम्ही चर्चा करू असं उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय आरक्षणावर दिले.
तसेच माझं आंदोलन हे महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी आहे. शिंदे समिती काम करतेय. आणखी बऱ्याच नोंदी सापडणार आहे. पहिले शेती करणाऱ्यांना कुणबी म्हटलं जायचं. राज्यातल्या शेवटच्या मराठाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. आजही गावखेड्यात ओबीसी-मराठा एकत्रित राहतायेत. भुजबळांना सोडले तर अजून कुणी आरोप केलाय का?, तो एसीत झोपतोय, इथं आमच्या गावखेड्यात कुणाला काहीही अडचण नाही. ज्यांनी घरे जाळले त्यांचे समर्थन आम्ही करत नाही. पण निष्पाप पोरांना कशाला उचलताय?, सरकारला गुन्हे मागे घ्यावेच लागतील. आता काही दगाफटका झाला तर आता थेट आझाद मैदानात बसेन, वाशीतून माघारी फिरणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, आरक्षण ही सुविधा आहे. ज्याला घ्यायचे असेल त्यांनी घ्या, कुणीही आरक्षण घेण्यासाठी जबरदस्ती केली नाही असं उत्तर जरांगेंनी नारायण राणेंच्या टीकेवर दिले. ५४ लाख नोंदी मिळाल्या, प्रमाणपत्रे वाटली, एका नोंदीवर ७० जणांना लाभ होतोय, २ कोटी मराठ्यांना लाभ होतोय. जर शासकीय ओबीसीत नोंद सापडली आहे तर त्याचा फायदा केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे मिळणार आहे. मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण घ्यावे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केले.