Manoj Jarange Patil News: आम्हाला कधी वाटते की देवेंद्र फडणवीस चांगला माणूस आहे. तर कधी वाटते की, गोड बोलून आमची मान कापायचे प्रयत्न सुरू आहेत. बार्शीच्या आमदाराला सांगून मराठा विरुद्ध मराठा उभे करत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी त्याला पूर्ण बळ दिलं आहे. पण तो निवडणुकीत टिकणार नाही. मराठ्यांच्या विरोधात जावू नये. तू जा मग तुला मराठे काय आहेत ते कळेल. तुला सांगतो, तू आरक्षणाच्या फंद्यात पडू नकोस. तुला देवेंद्र फडणवीस सांगतात तसे तू करतो. फडणवीसांना सांगतो, हे सगळे बंद करा, या शब्दांत पुन्हा एकदा मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे.
रोज रोज भूमिका बदलू नका, २८८ उमेदवार उमेदवार तुम्ही उभे करणार आहात असे बोलता, तुमच्यात हिंमत असेल २८८ उमेदवार उभे करा, हे आमचे आव्हान आहे. प्रत्येक वेळी बदलायचे कारण काय, आज उपोषणाला बसतात आणि दुसऱ्या दिवशी उठतात. आता जरांगे मुस्लिमांनीही आरक्षण द्या बोलतायेत. माहिती नसलेल्या गोष्टी अर्धवट माहिती असणारे लोक बोलतात. मध्येच बोलतात मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार, मी हे करणार वैगेरे... एकच काम करा २८८ जागा लढवा, असे आव्हान छगन भुजबळ यांनी दिले. भुजबळ यांनी दिलेल्या आव्हानावर मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
छगन भुजबळांना मोजत नाही
मी छगन भुजबळांना मोजत नाही. काय करायचे ते जनता ठरवेल. सर्व वेळेवर कळेल. फक्त मराठा आरक्षणाला विरोध करु नको. मी सर्वच नेत्यांना सांगतो, मराठा आरक्षणाला विरोध करु नका. मराठा आरक्षणाला विरोध तर मग कितीही मोठा जहांगीरदार असूद्या, तो गेला म्हणजे गेला. त्याचा पराभव झाला, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरक्षणाबाबत लिहून घ्या, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर बोलताना, आम्ही राजकीय भूमिका घेतली नाही. कोण निवडून येणार आणि कोण पडणार याचा निर्णय होणार आहे. देवेंद्र फडणवीस आतापासूनच तंगड्या गळाल्या का, ते आतापासूनच म्हणतात की, त्यांचे सरकार येणार आहे. आम्ही तुमचे विरोधक नाही आणि शत्रू नाही. मराठ्यांना आरक्षण देऊन टाका, असे जरांगे म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक राऊत यांना उभे केले आहे. ही गरिबाची लढाई आहे. एकही मराठा सध्या आरक्षणाच्या आंदोलनाला विरोध करत नाहीत. चिरिमिरी खाणारे आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आणि आरोग्य मंत्र्यांच्या बंगल्यावर एक बैठक केली आणि तिथे काहीतरी शिजले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. मराठ्यांच्या आंदोलनाला धक्का लागला तर फक्त राजेंद्र राऊतच नाही तर देवेंद्र फडणवीसांनाही राज्यात फिरु देणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी थेट सांगितले.