जालना - लोकसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना पाडण्यासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या, महादेव जानकरांचाही पराभव करण्यासाठी प्रयत्न केले, गेल्या ७८ वर्षात एकही धनगर समाजाचा खासदार झाला नाही. प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांना साथ दिली नाही. मराठा समाजाचे जे मोर्चे निघाले ते अँट्रोसिटी रद्द करण्याची मागणी होती. त्यामुळे दलित बांधव, ओबीसी बांधव या भंपक माणसामागे का जाईल अशा शब्दात ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले की, मराठा तरुणांच्या मनात जरांगेंनी भ्रम निर्माण केला आहे. शरद पवार हे मॅनेजमेंट गुरु आहेत. जर समाजातील सर्व घटकांना जवळ घेतले असते तर आज ते पंतप्रधान झाले असते. शरद पवारांनी १० पैकी ८ जण मराठा उमेदवार दिले होते. ओबीसी उपोषणाची दखल मुख्यमंत्री घेत नाहीत. आज उपोषणाचा आठवा दिवस आहे. आरक्षण हे सामाजिक मागासवर्गासाठी आहे. मराठा समाजातील तरूणांनी शासनाशी भांडून योजना, धोरणं घेतली पाहिजे. तरूणांनी जरांगेंच्या नादाला लागून आत्महत्या करू नये असं त्यांनी सांगितले.
तसेच ज्या समाजाला हजारो वर्ष मानवतेची वागणूक दिली नाही त्यांना आरक्षण दिले आहे. आरक्षण ही लाभाची योजना नाही. तुम्ही या देशाचे नागरिक आहात, तुम्ही मागास समजून घेऊ नका यासाठी आरक्षण तरतूद आहे. तुम्हाला मिळतंय मग आम्हाला का नाही यासाठी आरक्षण मागणी जरांगे करताय. इतर समाजाशी तुलना केली जाते. जातीय जनगणना सरकारने करायला हवी अशी मागणीही लक्ष्मण हाके यांनी केली.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन राजकीय दृष्टीने सुरू आहे. आता मी निवडणुका लढणार असं विधाने तो करतोय. गावगाड्यातील ओबीसी सरपंच होतोय, गावातील सुतार, कासार सरंपच झाला तर यांना आवडत नाही. सिन्नरमध्ये बनावट दाखला काढून सरपंचपद घेतले आहे असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला.