लातूर : लातूर दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेनंतर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांच्या उपोषणाला भेट दिली. गेल्या १२ दिवसांपासून धनगर समाजाचे दोन बांधव आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची विचारपुस करत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मराठ्यांना आरक्षण देण्यास कोणत्याही राजकारण्याची ठाम भूमिका नसल्याचे सांगत धनगर समाजाच्या मागण्या योग्य असून मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. तसेच धनगर समाजाला आमचा पाठिंबा असल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यात मराठा ओबीसी हा वाद कधीच होणार नाही. छगन भुजबळ हे महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत. छगन भुजबळांना सरकारनं बळ दिलं आहे. त्यांना सरकामध्ये घेऊन मंत्रीपद दिलं आहे. त्या पदाचा गैरवापर करत आहेत. ओबीसीचे सगळे नेते माझ्या विरोधात उभं करण्याचं काम छगन भुजबळ यांनी केल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच, मी माझा समाज एका बाजुला आहे. सगळे ओबीसीचे नेते एका बाजुला आहे. नेते राजकीय स्वार्थासाठी काम करत असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
आमची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे. फक्त सगे-सोयरेची अंमलबजावणी झाली नाही. तेच आमचं म्हणणं आहे की, लवकर १३ तारखेपर्यंतअंमलबजावणी करा. सरकार आमचा गेम करणार असं वाटत नाही. सत्ताधारी, विरोधक यांना गांभीर्य नाही. त्यांना कधीही गरीबांशी देणं घेणं नाही. महाराष्ट्र पेटता राहणार नाही, असं महायुती आणि महाविकास आघाडीचं जरी हे स्वप्न असलं, तरी भुजबळचं स्वप्न राज्य पेटता राहण्याचं आहे. छगन भुजबळांना माझ्या विरोधात सरकारने उभं केलं आहे, असा गंभीर आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला.
याचबरोबर, बीडच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली असे संदेश आले आहेत. मात्र, धंनजय मुंडे यांनी सांगितले की तसे काही नाही. याबाबत धनंजय मुंडे यांचे कौतुक आहे. मात्र, तुमच्या लोकांकडून मराठ्यांना त्रास होत आहे. मराठ्यांचे कार्यक्रम उधळून लावू नका. मराठ्यांच्या लोकांना मारू नका. आमच्या लोकांना शिवीगाळ करू देऊ नका. तुम्ही परवानगीच्या बाजूने जसं पटकन बोलललात. तुम्ही मराठ्यांवर अन्याय केला तर मराठे कसे तुम्हाला सोडतील. तुम्ही मराठ्यांना त्रास दिला तर मी मराठ्यांच्या बाजूने उभे राहिल. तुम्ही जातीयवाद मोडून टाकण्यासाठी उभे राहा. मराठे तुम्हाला कधीही उचलून धरतील. मराठ्यांच्या बाजूने उभे राहा. तुम्ही वाईट वागाल तर मराठे तुम्हाला सत्तेपासून दूर करतील, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.