Maratha Reservation Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आता अधिक आक्रमकपणे लढा दिल्याचे दिसत आहे. या लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील राज्यभरात दौरे करत आहेत. मुंबईनंतर आता मनोज जरांगे राजगुरूनगर येथे पोहोचले. त्यांनी मराठा समाजाला संबोधित केले. यावेळी, सुनील कावळे यांचे बलिदान वाया जाणार नाही. कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला.
सरकारने स्थापन केलेली समिती नेमके काय करते, अशी विचारणा करत, आत्महत्या करू नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. तसेच ही संधी पुन्हा मराठा समाजाला मिळणार नाही. २४ तारखेनंतर असे आंदोलन केले जाईल की, सरकारला झेपणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. घराघरात जाऊन मराठा आरक्षणाविषयी माहिती द्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही एकच मागणी आमची आहे. विशेष अधिवेशन घेऊन कायदा पारित करा, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मराठ्यांशी गद्दारी करायची नाही. मी मरेपर्यंत मराठा समाजांशी गद्दरी करणार नाही. माझ्या जातीला न्याय देण्यासाठी मी उभा आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या वेदना सहन होत नाही
मराठा समाजातील एका बांधवाने काल आत्महत्या केली. मराठा समाजावर दु:खाचा डोंगर कोसळला. मराठा समाज कावळेंचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच माया कमी पडू देणार नाही. कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही. मला मराठा समाजाच्या वेदना सहन होत नाही. मी हार, तुरे स्विकारण्यासाठी नाही तर मराठ्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गावागावात फिरत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. आत्महत्यांना सरकार जबाबादार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर आत्महत्या झाल्या नसत्या, अशी घणाघाती टीका मनोज जरांगे यांनी केली.
दरम्यान, मराठ्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. हे शांतता युद्ध आहे. ठोकल्याशिवाय आंदोलन मिळत नाही, अशी एकेकाळी मराठा समाजाची भावना होती, पण आता शांततेच आरक्षण मिळवणार असा शब्द आहे. मी मराठा समाजाच्या शब्दापुढे जात नाही. मराठा समाज माझा मायबाप आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राज्यातला मराठा एक झाला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.