Manoj Jarange Patil Reaction On CM Eknath Shinde Sharad Pawar Meet: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीचा तपशील अधिकृतरीत्या समोर आला नसला तरी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा पेच सोडविण्यासाठी आणि राज्यात जातीय सलोखा टिकविण्यासाठी सरकारला सहकार्य करावे, अशी विनंती शरद पवारांना केल्याचे समजते. या भेटीबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांना शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र, त्यांच्या भेटीदरम्यान काय झाले हे मला सांगता येणार नाही. नेमकी त्यांची भेट कशासाठी झाली हेच मला माहिती नाही. आरक्षणासाठी जर झाली असती तर बातमी बाहेर आली असती. सरकारचे प्रतिनिधी कोणी आले नाही, तरी मला काही वाटत नाही आणि आम्हीही त्यांना बोलवत नसतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
माझे उपोषण संपू द्या, सगळ्यांचा हिशोब घेतो
भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. यावर बोलताना मनोज जरांगे यांनी पलटवार केला. मला असे वाटते की, छगन भुजबळ आणि त्यांचे रक्त एक झाले आहे. कारण छगन भुजबळ यांची भाषा तशीच होती. फक्त माझे उपोषण संपू द्या, मी सगळ्यांचा हिशोब घेतो. माझ्या समाजासाठी उपोषण करत आहे. माझ्या शरीराला त्रास होतोय याची जाणीव मराठ्यांच्या नेत्यांना नाही. त्यांना हेच माहिती नाही की, उपोषण केल्याने काय हाल होतात? आरक्षण नसल्यामुळे आमच्या समाजाचे काय हाल होतात? परत एकदा सांगतो उपोषण संपू द्या, ते जे जे काही बोलले त्या सगळ्यांचा हिशोब घेणार, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला. त्याबद्दल त्यांचे खरेच कौतुक करतो. इथून मागे सांगत होतो की, मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात, ते फक्त एकनाथ शिंदे साहेबच. म्हणून सांगतो आरक्षण लवकर द्या, तुम्ही उशीर करू नका. समाजाचे हाल झाल्यानंतर देऊ नका, द्यायचे असेल तर लवकर द्या. मुदत वाढत देत असताना एसीबीसी, कुणबी आणि ईडब्ल्यूएस हे तीनही ऑप्शन खुले ठेवा म्हणजे मराठ्याचे पोर मागे राहणार नाही. ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांना म्हणजे मागेल त्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायचे हे मार्गी लावा. आणि तीनही गॅजेट लवकरात लवकर लागू करा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.