Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी नवी मुंबई येथे शक्तिप्रदर्शन केले. यानंतर मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आणि विजय गुलाल उधळत मराठा बांधव परतले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मराठा आरक्षणाबाबत जी अधिसूचना काढण्यात आली आहे, त्याची अंमलबजावणी झाली की, यानुसार सगेसोयरे यांना पहिले प्रमाणपत्र मिळाले की, जाहीर विजयी सभा घेणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
या अधिसूचनेवर सरकारने मते मागवली आहेत. यासाठी १५ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. माझी विनंती आहे की, मराठा आरक्षणाविषयाचे अभ्यासक, तज्ज्ञ आहेत, यासंदर्भातील खाचखळगे ज्यांना माहिती आहेत, त्या सगळ्यांनी सरकारच्या अधिसूचनेवर मत मांडावे. सगेसोयरे या शब्द अंतिम झाल्यावर याचा लाखो लोकांना फायदा मिळणार आहे. व्हॉट्सएप आणि फेसबुकवर गप्पा मारत बसण्यापेक्षा समाजाला उपयोगी होऊन तुमची गुणवत्ता सिद्ध करा. तुमच्या बुद्धीचा उपयोग तिथे करा. सगेसोयरे याचा कायदा मजबूत होण्यासाठी मदत करा, असे मनोज जरांगे म्हणाले.
काही लोकांना उगीच पोटदुखी झाली आहे
काही लोकांना विचारले गेले नाही म्हणून उगीच पोटदुखी झाली आहे. इथे कशाला बोलता, तिथे कशाला मांडता, हे करण्यापेक्षा मराठा समाजाच्या कल्याणासाठी पुढे यायला हवे. मराठवाडा येथे कमी नोंदी झाल्यामुळे सरकारला राजपत्र करायला लावले आहे. १९०२ रोजीचेही पुरावे घ्यायला सांगितले आहे. मराठवाडा येथील मराठा समाज बांधवांना चिंता करण्याची गरज नाही. मराठवाड्यातील एकही मराठा लाभापासून वंचित राहणार नाही, असा शब्द मनोज जरांगे यांनी दिला.
बैठका घेणाऱ्यांनी थोडेतरी डोके वापरले पाहिजे
तो त्यांचा धंदा आहे, कोणाचे चांगले होऊ लागले की, यांच्या पोटात दुखते. कायद्याला काही होणार नाही. त्याच्या राजपत्रित अधिसूचना निघाल्या आहेत. बैठका घेणाऱ्यांनी थोडेतरी डोके वापरले पाहिजे. मराठ्यांची नियत चांगली आहे. ओबीसी समाजाचा फायदा झाला पाहिजे. तुमच्यासारखी लोकांच्या अन्नात माती कालवायची नियत आमची नाही, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.