Maratha Reservation Manoj Jarange Patil:मराठा आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आक्षेप घेतले जात आहेत. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिला असून, ओबीसी नेत्यांनी दिलेल्या सल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भूमिका स्पष्ट केली आहे.
मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण घेण्याचा हट्ट करू नये. त्यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र घेऊन आरक्षणही घेऊ नये. त्यातून त्यांना काहीच फायदा होणार नाही. ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घ्यावे. त्यातून त्यांचा फायदाच होणार आहे, असा सल्ला ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. यावर मनोज जरांगे यांनी भाष्य करत, EWS तुम्ही घ्या, आम्हाला १० टक्के आरक्षण द्या, असे म्हटले आहे.
ईडब्ल्यूएसचा एवढा फायदा होत असेल तर तुम्ही एवढी वाटणी कराच
तुम्हीच ईडब्ल्यूएस आरक्षण घ्या आणि दहा टक्के आरक्षण आम्हाला द्या. ईडब्ल्यूएसचा एवढा फायदा होत असेल तर तुम्ही एवढी वाटणी कराच. कायदा म्हणतो लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले जाते. त्यामुळे आम्हाला ५० टक्के आरक्षण हवे. तेवढे आरक्षण आम्हाला मिळणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणार आणि आम्ही ते घेणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ईडब्ल्यूएसचे डबल डबल काढू नका. ते तुम्हाला घ्या आणि त्याबदल्यात १० टक्के आरक्षण आम्हाला द्या. डोंगराचे वावर आम्हाला दिले. जे वावर पिकत नाही ते आम्हाला दिले. आणि काळी जमीन तुम्ही घेतली. आम्हाला वेडे समजता का, अशी विचारणा करत, ज्यात औतच चालत नाही ते आम्हाला देत आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
दरम्यान, मनोज जरांगे यांची प्रकृती आता चांगली झाली असून, रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. मीडियाशी बोलताना, दमाने का होईना पण आम्ही आरक्षण घेणारच. घेतल्याशिवाय राहणार नाही. २४ तारीख बदलण्याचा संबंध नाही. तारीख मागेपुढे होईल असे मी म्हटले नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.