जालना - Manoj Jarange Patil on Maratha ( Marathi News ) बीडमधील जातीवाद थांबवा, आम्ही कुठेही जातीवाद केला नाही. जर जातीवाद थांबला नाही, हा अन्याय बंद करायचा असेल तर आपल्याला सत्तेत जावं लागणार आहे. दुसरा मार्ग शांत राहा. ज्या जातीनं मराठ्यांवर अन्याय केलाय त्या जातीच्या उमेदवाराचं नाव घेऊन त्याला पाडल्याशिवाय सोडायचा नाही. आपल्यापुढे पर्याय नाही. विधानसभा जवळ आहेत, जी जात मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याचा माणूस निवडून येऊ द्यायचा नाही. त्याला सत्तेत जाऊ द्यायचं नाही. कारण तो सत्तेत गेल्यास मराठ्यांवर अन्याय करतो. त्यामुळे जातीवाद थांबवावा असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलन हा संविधानाने दिलेला हक्क आहे. जातीय तेढ आणि आरक्षणाचं आंदोलन याचा संबंध नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतोय. आरक्षणाच्या मागणीत मराठा-ओबीसी वाद आणण्याची गरज नव्हती. बीडमध्ये जातीयवाद हा महाराष्ट्रासाठी चांगला संदेश नाही. यावर सुधीर मुनगंटीवार, शंभुराज देसाई यांनी उत्तर द्यायला हवं. जातीवाद कुणी केला? आम्ही कधी जातीवाद केला? मराठ्यांनी जातीवाद कुठे केला, आम्ही कधीही जातीवाद केला नाही आणि करूही देणार नाही. बीड जिल्ह्यातील मराठ्यांनी शांत राहावे. लोकसभा गेली आणि आता विधानसभेला बघू असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच बीडमध्ये जातीवाद कोण करतंय हे सगळ्यांना माहिती आहे. व्यासपीठावर बसणाऱ्या मराठा आमदारांना लाज वाटली पाहिजे. मी कधीही ओबीसी-मराठ्यात जातीवाद केला नाही. मी जातीवाद कधी केला हे दाखवून द्यावं. मी कुणालाही दुखावलं नाही. मी बहिण भावांना कधीच विरोधक मानलं नव्हतं. त्यांनी विनाकारण आम्हाला हिणवलं. तुम्ही हिणवू नका असं मी वारंवार सांगत होतो. मी जर याला पाडा बोललो असतो तर अर्धे मराठे व्यासपीठावर राहिले नसते. मराठ्यांच्या दुकानात जायचं नाही, हा कुठला जातीवाद, तुमचा इतका स्वाभिमान जागा झाला? बीडचं नव्हे तर महाराष्ट्रात जातीवाद निर्माण होऊ देणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, तुम्हाला जातीय तेढच निर्माण करायचं असेल तर बघू. वंजारी आणि मराठ्यांचे कधीही काही झालं नाही. आम्ही जातीवाद करत नाही. १ महिनाभर मराठे शांत बसतील. कोण काय काय करतंय ते बघू. अन्याय आमच्याच लोकांवर झालाय. बीड जिल्हा संताची भूमी आहे. आम्ही कधीच ओबीसीच्या दुकानावर जाऊ नका असं म्हणणार नाही. इतक्या खालच्या दर्जाचे विचार आम्ही ठेवणार नाही. १३ तारखेपर्यंत मराठे चांगले होते. त्यानंतर मराठे वाईट झाले. ज्या मराठा आमदारांनी ओबीसी उमेदवारांसाठी काम केले ते मराठा जात संपवावी यासाठी केले का असा प्रश्न समाज विचारणार आहे असंही जरांगे बोलले.
४ जूनला उपोषणाला बसणारच
आम्ही सरकारच्या शब्दापुढे नाही. ४ जूनला उपोषण सुरू करणार आहे. सगेसोयरे अंमलबजावणीसाठी ५ महिने उलटून गेले. मी आरक्षण घेतल्याशिवाय कुणालाही सुट्टी देणार नाही. सरकारमध्ये तुम्ही आहात त्यामुळे तुम्हाला बोलावेच लागेल असं म्हणत जरांगे पाटील यांनी उपोषणावर ठाम असल्याचं सांगितले.