Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम देत २० जानेवारी रोजी कोट्यवधी मराठा समाजातील बांधवांसह मुंबईला धडकण्याचा निर्धार केला आहे. तसेच ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळावे, यावर मनोज जरांगे ठाम आहेत. मात्र, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, असे छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले आहे. बीड येथे आयोजित एल्गार मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेचा मनोज जरांगे पाटील यांनी खरपूर शब्दांत समाचार घेतला.
ते राष्ट्रीय नेत्यांना सांगत आहेत की आमच्या मुंबईतील मोर्चाच्या पाठिशी उभे राहा. ते नेतेही म्हणतात आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. त्या नेत्यांना सांगायचे आहे, तुम्ही कोणाच्याही पाठिशी उभे राहा. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तुम्ही मराठा समाजाच्या पाठिशी उभे असाल तर त्याला माझी काही हरकत नाही. परंतु, ते म्हणतात की ओबीसीतूनच आरक्षण घेणार. त्यांची अशी भूमिका असेल तर त्यांना स्पष्ट सांगायचे आहे की, तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. ओबीसीतून मराठा सामाजाला आरक्षण मिळणार नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
छगन भुजबळ मंत्रिमंडळाला अन् राज्याला लागलेला कलंक
छगन भुजबळांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव खराब करायचे आहे. त्यांच्या मनात पहिल्यापासूनच मराठ्यांविषयी पाप आहे, विष आहे. आता या वक्तव्यांमधून बाहेर येत आहे. यापूर्वी राजकीय स्वर्थासाठी तुम्ही महाराजांचा वापर केलात. आता तुमचे पोट भरले आहे. म्हणून त्यांचे नाव खराब करत आहात. हा वेडा माणूस आहे. याआधीही त्याने महापुरुषांची नावे घेऊन त्यांच्या जाती काढल्या होत्या. हा मंत्रिमंडळाला आणि राज्याला लागलेला कलंक आहे. याला मंत्रिमंडळात ठेवू नये. परंतु, त्याला हे लोक का सांभाळत आहेत तेच कळत नाही. त्यांनी भुजबळाचा उदो उदो का चालवलाय ते माहिती नाही. त्याचे लाड का पुरवले जातायत तेच कळत नाही. परंतु, त्याचे लाड पुरवणाऱ्यांना हे प्रकरण जड जाणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान, मराठा आंदोलनाच्या काळात बीडमधील काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळेच भुजबळ यांनी बीडमध्ये हा एल्गार मेळावा घेतला. यावेळी भुजबळ म्हणाले, छत्रपतींचे नाव घेऊन बीडमध्ये जाळपोळ करण्यात आली. यावर, मनोज जरांगे भुजबळांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले, त्याला हे कोणी सांगितले? मला वाटते त्याच्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, कारण त्याला बुद्धी नाही. आता मराठ्यांवर आरोप करतोय, छत्रपतींचे नाव घेतोय, असा पलटवार मनोज जरांगे यांनी केला.