Manoj Jarange Patil News: राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर केलं असलं तरी जोपर्यंत कुणबी नोंदींबाबत काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मात्र, अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले.
मनोज जरांगे पाटील हे सरकारकडे एकही निवेदन देत नाही. मनोज जरांगे पाटील हे रोज पलटी मारतात. सातत्याने भूमिका बदलतात आणि नेहमी खोटे बोलतात. मनोज जरांगे पाटील यांनी २३ डिसेंबर रोजी पहिली गुप्त मिटिंग कन्हैया हॉटेलमध्ये घेतली. त्या मिटिंगचा साक्षीदार आहे. तिथे जरांगे पाटील आतमध्ये एक बोलले आणि बाहेर कॅमेऱ्यासमोर जाऊन दुसरेच बोलले. मी योग्यवेळी ते जाहीर करीन, असा इशारा अजय महाराज बारस्कर यांनी दिला. या टीकेचा मनोज जरांगे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
अजय महाराज बारस्कर यांची माफी मागणार नाही
अजय महाराज बारस्कर यांची माफी मागणार नाही. मला पाणी पाजून त्याला मोठे व्हायचे होते. तुकाराम महाराजांच्या आडून समाजाचे वाटोळे करू नका. अजय महाराज बारस्कर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज आहे. आंदोलन संपवण्याचा घाट आहे. या बाबाला उत्तरे देणार नाही, काय बोंबलायचे ते बोंबल, अन्यथा याला वेगळे वळण लागू शकते, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तसेच एक ट्रॅप झाला असून त्यावेळी त्याला जागा मिळाली नाही हा दुसरा ट्रॅप असून प्रत्येकवेळी कोणीतरी घुसवण्याचा डाव आहे. या दोन चार जणांना आंदोलनात काही मिळवायच होते, ते मिळाले नसेल. त्यांना ट्रॅप करायचा होता. त्यात शिंदे यांचा आणि त्याचा एक माणूस होता. शिंदे यांचा प्रवक्ता आहे. तो मला बदनाम करण्याचा सरकारचा ट्रॅप होता, असे जरांगे म्हणाले.
दरम्यान, २४ फेब्रवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता आपआपल्या गावात रास्तारोको आंदोलन सुरू करायचे. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा, असे निवेदन पोलीस आणि महसूल प्रशासनाला निवेदन द्यायचे. अधिकाऱ्यांच्याच हातात हे निवेदन द्यायचे. २५ फेब्रुवारीलाही असाच रास्तारोको करून अधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे. जोपर्यंत सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत रोज असे आंदोलन करायचे. सरकारने २४ ते २९ फेब्रुवारीपर्यंत सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाजातील सर्व वृद्ध व्यक्तींनीही आमरण उपोषण करायचे. यातील एकाच्याही जीवाला बरे-वाईट झाले तर जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.