Manoj Jarange Patil News: मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत मोठे विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटण्यासाठी पेटारे-बिटारे असे काहीच नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला होता. या विधानावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. यातच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनीही याबाबत प्रतिक्रिया देताना तीव्र संताप व्यक्त केला.
मराठा आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटीमध्ये उपोषण सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित करून उपचार घेण्यासाठी गॅलेक्सी हॉस्पिटल येथे भरती झाले असता त्यांच्यावर पाच दिवस उपचार सुरू होते. त्यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला असून, ते त्यांच्या मूळ गावी निघाले आहे. त्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
छत्रपती शिवरायांपेक्षा कुणी मोठे नाही
राहुल सोलापूरकर यांच्या विधानाचा जाहीर निषेध आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचा केवळ निषेध करून भागणार नाही, अशांना नीट रट्टे दिले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जेल भोगले, तर काही हरकत नाही. अशा लोकांचा माज आणि मस्ती उतरवायला हवी. ही अशी माणसे पटकन काही बोलून जातात. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी जीव की प्राण आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलले, त्यांना हाणायचे, सोडायचे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कुणीही मोठे नाही, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, ज्या लोकशाहीमध्ये आपण वावरतो त्या लोकशाहीचा पाया छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला. त्यांनी स्वत:चे कुटुंब कधी पाहिले नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच तडजोड केली नाही, त्यांच्याबद्दल गलिच्छ विधान केली जातात. दोन, तीन दिवसापूर्वी असंच एक विधान केले. या विधानामुळे अनेक शिवभक्तांना वेदना झाल्या. हा राहुल सोलापूरकर कोण आहे? अशी लोक काही लाच घेतात, त्यांनी लाचे पलिकडे काही समजत नाही. हे लोक बोलत असताना काहीही बोलतात. अशा लोकांच्या जिभा हासडल्या पाहिजेत. अशा लोकांना जनतेने दिसेल तिथे ठेचले पाहिजे, असा सांगत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला.