सांगली - मराठा-ओबीसींमध्ये विनाकारण वाद निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. पुरावे मिळाल्याने आता ओबीसीमधूनच मराठा आरक्षण मिळविणार आहे. मात्र, ओबीसी आरक्षणात मराठ्यांना येऊ द्यायचे नाही असा काहींचा प्रयत्न आहे. त्यामुळेच त्यांचा तीळपापड होत आहे. समाजाचा देव बनण्याचा प्रयत्न मी कधीच केलेला नाही, पण लोकांचे रक्त पिऊन, पैसे घेऊन पाच वर्षे जेलमध्ये जाणाऱ्यांनाच लाेकांनी आपल्याला देव मानावे असे वाटत आहे. मात्र, अशांना शेंदूर कोण लावणार, अशी टीका मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली.
सांगलीत शुक्रवारी जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा त्यांनी खरमरीत शब्दात समाचार घेतला. जरांगे पाटील म्हणाले, त्यांचे वय झाल्याने आता टीका करण्यापेक्षा दुसरे कोणतेही काम उरलेले नाही. यामुळे ते टीका करत सुटले आहेत. मराठा समाज ओबीसीमध्ये आला आहे हे आता सिद्ध झाले आहे. त्याचे पुरावेही समोर आले आहेत. त्यामुळे आता अशा टीकाकारांवर लक्ष देण्याऐवजी त्यांना महत्त्व देणार नाही. समाजाचा देव बनण्याचा मी कधीच प्रयत्न केलेला नाही. उलट त्यांना समाजाने देव मानावे असे वाटत आहे. पण, लोकांचे रक्त पिऊन आणि पैसा खाऊन पाच पाच वर्षे जेलमध्ये तुम्ही जाता. तुम्हाला कोण शेंदूर फासणार आहे.
मराठा-ओबीसी प्रश्नावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडावी आणि दंगली घडाव्यात अशीच त्यांची इच्छा आहे. मात्र, असे कोणतेही भाष्य त्यांनी करू नये. माझ्यावर टीका करा पण समाजाला आरक्षण मिळविल्याशिवाय आता शांत बसणार नाही. धमक्या देऊन शांतता बिघडविण्याचे काम सध्या भुजबळ यांच्याकडून सुरू आहे. जनतेच्या नजरेतून उतरल्यानेच आता स्थान मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. लोकांच्या भावना भडकविण्याचे काम थांबवावे असेही ते म्हणाले.