Manoj Jarange Patil: रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांचा तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौरा सुरू झाला आहे. यातच मनोज जरांगे यांनी पहाटे ४ वाजता एका भागात सभा घेतील. कडाक्याच्या थंडीत पहाटे ४ वाजताही मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला हजारोंची संख्या होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजता करमाळा तालुक्यातील वांगी येथे मनोज जरांगे यांची सभा पार पडली. बुधवारी संध्याकाळी ७ वाजता ही सभा होणार होती. मात्र, मनोज जरांगे पाटील या सभेला गुरुवारी पहाटे ४ वाजता पोहोचले. असे असले तरी थंडीमध्ये कुडकुडत हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांनी हजेरी लावली. बुधावारी सायंकाळी ही सभा होणार असल्याने दुपारपासूनच मराठा समाज हजारोंच्या संख्येने जमायला सुरूवात झाली होती. इंदापुर येथील लोक या सभेसाठी पोहोचले होते. सभेसाठी लाखाच्या आसपास लोक जमले होते. परंतु, मनोज जरांगे यांना पोहोचण्यासाठी उशीर झाला. ते पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पोहोचले.
हा मराठा समाज कधीही विसरणार नाही
मनोज जरांगे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पहाटे ४ वाजताही कडाक्याच्या थंडीत सभा घेतली. ४ ते ५ मिनिटे मनोज जरांगे बोलले. मराठा समाजाला आरक्षण मिळेल, तेव्हा ही करमाळ्याची सभा कायम लक्षात राहील. तुमचे जे प्रेम आहे, ऋण आहे ते हा मराठा समाज कधीही विसरणार नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
दरम्यान, यानंतर आता दौड, मायणी. सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड, सातारा, मेंढा, वाईस रायगड, रायगड, महाड, मुळशी, आळंदी, तुळापूर, खालापूर, कल्याण, ठाणे, पालघर, नाशिक, त्रंबकेश्वर, विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, भोदेगाव, अवमापूर, धोंडेगाव, या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा तिसऱ्या टप्प्यातील दौरा असणार आहे.