Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. राज्यभरातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. मात्र, अद्यापही काही मागण्यांवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीला मराठा उमेदवार उभे करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले होते. मात्र, यावर पुढे काही झाले नाही. यातच आता आपण कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल दोन्ही सारखेच आहेत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला मोठा इशारा दिला. महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले. आज देऊ, उद्या देऊ असे करून सात महिने झाले. ६ जूनपर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण दिले नाही तर पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार आहे. तसेच, मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. आता मात्र लोकसभेत कुणालाही पाठिंबा नसल्याचे म्हटले आहे.
महायुती अन् महाविकास आघाडी दोन्ही सारखेच
मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपण कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत कोणत्या एका पक्षाची बाजू घेतलेली नाही. अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी समाजाने पाठबळ लावलेले नाही. आमच्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही सारखेच आहेत. महायुतीला पाठिंबा दिला आहे, ना महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आपण राजकारणात नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांच्यासह कोणाला पाडा किंवा कोणाला पाडू नका, असे जाहीर सांगितले नाही. महाविकास आघाडी अथवा महायुती दोन्ही घटक आपल्यासाठी सारखेच आहेत. या निवडणुकीत आपली कोणतीही राजकीय भूमिका नाही, असे जरांगे म्हणाले.