Maratha Reservation Manoj Jarange Patil: १५ नोव्हेंबरपासून मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील आपल्या तिसऱ्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे कोकणात असून, त्यांनी जिजामाता समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला सर्वपक्षीय पाठिंब्याची गरज आहे, असे म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील शनिवारी रात्री पोलादपूर मार्गे पाचाड येथे दाखल झाले. सकाळी जीजामाता समाधीचे दर्शन घेतले. यानंतर रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. मीडियाशी बोलताना मनोज जरांगे यांच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. मनोज जरांगे यांच्यावर जेसीबीतून फुले उधळली जातात. यावरून टीका करण्यात आली होती. याबाबत मनोज जरांगे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, अशी टीका करणाऱ्यांवर कोणी फुले उधळत नाही, त्याला आम्ही काय करणार. हे योग्य नाही, असा खोचक टोला मनोज जरांगे यांनी लगावला.
कोणाच्या तरी दबावामुळे कोकणातील नेत्यांनी तसा विरोध केला
कोकणातील राजकीय नेत्यांनी यापूर्वी जरी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केला असला तरी आता ते करणार नाहीत. त्यावेळी कोणाच्या तरी दबावामुळे कोकणातील नेत्यांनी तसा विरोध केला असेल, तरी आता ते विरोध करणार नाहीत. छत्रपतींचे आशिर्वाद मराठा समाजावरील अन्यायाविरोधात सरू केलेल्या लढ्याला पुन्हा जोमाने सुरू करत असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आता सुट्टी देणार नाही, मात्र या लढ्यासाठी सर्व समाजाने शांततेच्या मार्गानेच एकजूट दाखवली पाहिजे. आपल्याला एकजुटीशिवाय पर्याय नाही. आपली एकजूट दाखवून द्या, वेगवेगळे गट दाखवू नका. मराठ्यांची राज्यात सध्या त्सुनामी आली आहे. आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल असे वागू नका, कुणीही आततायीपणा करू नका. शांतता हीच मराठा समाजाची खरी शक्ती असून आपणास डिवचून काही तरी विपरित घडविण्याचे कारस्थान आहे. या धोक्यापासून सर्वांनी सावध राहावे. २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर आंदोलनाची दिशा काय असेल हे ठरविण्यात येईल. तोपर्यंत आपण संयम आणि शांततेने हे आंदोलन पुढे न्यायचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी म्हटले होते.