Manoj Jarange Patil Maratha Reservation News: मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके दोघेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे ओबीसीतून मराठा आरक्षण, सगेसोयरेची अंमलबजावणी यावर ठाम असून, ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, यासाठी लक्ष्मण हाके यांनी एल्गार पुकारल्याचे पाहायला मिळत आहे. यातच हीच वेळ आहे. मराठा आमदारांनी एकत्र यायला हवे. आम्ही गेल्यावर तुम्ही एकत्र येणार का, असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी विचारला आहे.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुम्ही माझी निष्ठा विकत घेऊ शकत नाही. मराठा समाज एका झाल्याने यांचे पोट दुखत आहे. किती जरी झाकले तरी ते उघडे होतच आहे. आपल्याला सुद्धा परिवार आहे, आपले सुद्धा आंदोलन आहे. मी कोणाला घाबरत नाही, माझा रस्ता स्पष्ट आहे. मराठा समाजाला टक्कर देण्याचे काम कोणी करू नये. मी निर्भीडपणे बोलतो. मी मराठा समजासाठी मरायला तयार आहे. आता तर मी आंतरवाली सराटीत कुठेही राहणार, असे मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले.
आपल्याला लढूनच मिळवावे लागणार आहे
पोलिसांत तक्रार केली तर आम्हाला न्याय मिळणार नाही. मराठा समाजात असा मेसेज गेला, आता आपल्याला न्याय मिळणार नाही. आपल्याला लढूनच मिळवावे लागणार आहे. मराठा समाजातील गोरगरीब, पोरे मोठी व्हावे, यासाठी मी लढतो आहे, असे सांगताना, येवला वाला राजकीय फायद्यासाठी करतो आहे. ओबीसींचे नेते येवला वाल्याने एकत्र केले. जर ओबीसी समाज ताकदीने एकत्र येऊ शकतो तर आता मराठ्यांनी या शांतता रॅलीत एकत्र यावे. ओबीसींच्या नेत्यांचा पहिल्या पासून विरोध आहे, शांतता रॅली निघणार आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
आम्ही मेल्यावर तुम्ही एकत्र येणार का?
६ जुलै ते १३ जुलै शांतता रॅलीत सर्वांनी एकत्र यावे. आता हीच वेळ आहे. मराठ्यांना चारी बाजूने घेरलेले आहे. मराठा आमदारांनी आता एकत्र यावे आणि अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलावे. ते अधिवेशनात मराठा आरक्षणाची मागणी करतील, असे वाटत आहे. आता मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र यावे. आम्ही मेल्यावर तुम्ही एकत्र येणार का, असा संतप्त सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे.