Manoj Jarange Patil On Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. कुणबी प्रमाणपत्रे मिळण्यास सुरुवात झाली आहे. २४ डिसेंबरला आरक्षण मिळेल. कुणीही आत्महत्या करु नये. मराठा आरक्षणासाठीची एकी आपली दिसली पाहिजे. काही मागेपुढे झाले तर आपल्याला सज्ज राहायचे आहे. कुणीही मतभेद होऊ देऊ नका. आपण एकजूट ढळू द्यायची नाही. आपली एकी आपण दाखवून देऊ, असे आवाहन करत, ओबीसी नेत्यांनी ४० वर्षे आमचे आरक्षण खाल्ले, असे मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आता महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचे जाहीर केले. आम्ही राज्यातील मराठा समाजाची गाठीभेटी घेण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू करत आहे. १५ नोव्हेंबर २०२३ पासून ते २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा तिसरा टप्पा सुरू करत आहे. यासह हा तिसरा टप्पा संपणार आहे. आम्ही असे सहा टप्प्यात दौरा करणार आहोत. पुढे चौथा, पाचवा, सहाव्या टप्प्यातील दौरा करणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली. यावेळी ओबीसी नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर मनोज जरांगे यांनी भाष्य केले.
ओबीसी नेत्यांनी ४० वर्षे आमचे आरक्षण खाल्ले
ओबीसी नेत्यांनी ४० वर्षे आमचे आरक्षण खाल्ले हे सामान्य ओबीसींना पटले आहे. त्यामुळेच तो समाज आमच्या बाजूने आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, आमच्याकडे पुरावे आहेत. ओबीसी बांधवांच्या मनात काहीही नाही. आत्तापर्यंत ४० वर्षे मराठा बांधवांचे नुकसान झाले आहे. आता ओबीसी लोकांना हे कळले आहे. गावागावांत हे परिवर्तन झाले आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते.
दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील १५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा. १६ रोजी दौड, मायणी. १७ रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड. १८ रोजी सातारा, मेंढा, वाईस रायगड. १९ रोजी रायगड, रायगड दर्शन, रायगड ते पाचाड, महाड, मुळशी, आळंदी. २० रोजी आळंदी, तुळापूर, खालापूर, कल्याण, २१ नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक, त्रंबकेश्वर. २२ रोजी विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर. २३ रोजी नेवासा, शेवगाव, भोदेगाव, अवमापूर, धोंडेगाव, असा तिसऱ्या टप्प्यातील दौरा आहे.