Manoj Jarange Patil: बिहारमध्ये जातनिहाय जनगणना केल्यानंतर आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात आली. तसे दुरुस्ती विधेयक बिहारच्या नितीश कुमार सरकारने विधिमंडळात मंजूर करून घेतले. यावर राज्यपालांनीही शिक्कामोर्तब केले. यानंतर आता देशातील अनेक राज्यातून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तापत चालला असून, बिहारप्रमाणे राज्यात आरक्षणाची मर्यादा वाढवायला हरकत नाही, असे मत मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
बिहार विधानसभेने १० नोव्हेंबर रोजी जातीआधारित आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ६५ टक्के करणारे विधेयक मंजूर केले. केंद्राने काही वर्षांपासून लागू केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या १० टक्के आरक्षणासह बिहारमधील आरक्षण आता ७५ टक्क्यांवर गेले आहे. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातीनिहाय सर्वेक्षण करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली.
बिहारप्रमाणे राज्यात आरक्षणाची मर्यादा वाढवायला हरकत नाही
आरक्षणाची मर्यादा वाढवण्यास काहीच हरकत नाही. परंतु, ते करत असताना मराठा समाजाशी कुठल्याही प्रकारचा दगाफटका व्हायला नको. हे आमचे ठाम मत आहे. आमच्याशी दगा करून बिहारप्रमाणे आरक्षण वाढवले आणि आम्हाला महत्त्व दिले नाही, तर आम्हाला तो कायदा मान्य नसेल. आमची लेकरे किती दिवस त्रास सहन करत आहेत हे आम्हाला माहिती आहे. मराठ्यांना डावलून हे होणार असेल तर ते आम्हाला मान्य होणार नाही. तुम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवा. परंतु, आधी मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा, यावर आम्ही ठाम आहोत, असे मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, गेली ७० वर्ष गोरगरिब मराठ्यांच्या लेकरांनी आरक्षणाची वाट पाहिली. आता कुठेतरी राज्यात ३२ लाख लोकांना आरक्षण मिळाले आहे. सातत्याने कुणबी नोंदी आढळतायेत. त्यामुळे मराठा समाजात आनंद आहे. १ डिसेंबरपासून महाराष्ट्र दौरा सुरू होईल. १२ डिसेंबरपर्यंत हा दौरा चालेल. जालना इथे मोठा कार्यक्रम १ तारखेला होणार आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.